माजी संचालकांची ‘हिट विकेट’
By Admin | Updated: April 6, 2015 01:21 IST2015-04-06T01:18:32+5:302015-04-06T01:21:19+5:30
जिल्हा बँक घोटाळा : सहकार विभागाच्या चौकशी शुल्क कारवाईने खळबळ

माजी संचालकांची ‘हिट विकेट’
अविनाश कोळी ल्ल सांगली
नामांकित क्रिकेटपटूने स्वत:च्या बेल्स स्वत: उडवून हिट विकेट होण्यासारखा प्रकार जिल्हा बॅँकेतील माजी संचालकांच्याबाबतीत झाला. स्वत:च्याच नियमबाह्य कारभाराचा फटका त्यांना बसला. तब्बल ४० माजी संचालक एकाचवेळी बाद झाले. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करून मैदानात उतरताच सहकार विभागाच्या कारवाईने शून्यावर बाद व्हावे लागल्याने या माजी संचालकांना धक्का बसला आहे.
जिल्हा बॅँकेतील २००१-२००२ ते २०११-१२ या कालावधित झालेल्या ४ कोटी १८ लाखांच्या गैरव्यवहाराचे भूत आता या माजी संचालकांच्या मानगुटीवर बसले आहे. निवडणूक लढवून पुन्हा बॅँकेच्या कारभारात सन्मानाने परत येण्याची स्वप्ने रंगविली जात असतानाच, या माजी संचालकांना नव्या सहकार अस्त्राने घायाळ केले. जखमी अवस्थेत त्यांना आता मैदानातून बाहेर व्हावे लागले आहे. नियमबाह्य कारभाराचा फटका त्यांना बसला आहे. लवकरच गैरव्यवहाराच्या रकमेचीही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे चौकशी शुल्काचा केवळ ट्रेलर होता. अजून ‘पिक्चर बाकी’ आहे, असाच संदेश या कारवाईतून मिळाला आहे. याविरोधात न्यायालयीन लढाईसुद्धा या माजी संचालकांमार्फत दिली जात आहे. प्रत्येकाच्या डोईवर आलेली जबाबदारी केवळ ४२६ रुपयांची आहे. रक्कम किरकोळ असली तरी, या रकमेचा झटका मोठा आहे. हेच ४२६ रुपये त्यांना सहकाराच्या मैदानातून कायमचे बाजूला करणारे ठरू शकतात. म्हणूनच या चौकशी शुल्काचा झटका अनेकांच्या जिव्हारी लागला आहे.
सहकार विभागाच्या आक्रमक धोरणांमुळे सध्या माजी संचालक बॅक फूटवर असतानाच सहकार विभागाच्या थोड्याशा ‘हुशारी’ने ४० माजी संचालक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या मैदानातून बाद झाले. अर्थात पक्षीय पातळीवरही वादग्रस्त माजी संचालकांना पुन्हा बॅँकेत प्रवेश द्यायचा की नाही, याबाबत विचारमंथन सुरू आहे. हे मंथन सुरू असतानाच सहकार विभागानेच झटका दिल्याने माजी संचालकांसमोरील आणि पक्षीय नेत्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत.