नगर परिषदेसाठी महाडिक बंधूंची मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:45+5:302021-09-02T04:55:45+5:30
राहुल महाडिक, सम्राट महाडिक अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध सर्वच गटांना ...

नगर परिषदेसाठी महाडिक बंधूंची मोर्चेबांधणी
राहुल महाडिक, सम्राट महाडिक
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध सर्वच गटांना लागले आहेत. राष्ट्रवादीविरोधी असलेल्या सर्व गटांना एकत्रित घेऊन इस्लामपूर, आष्टा नगरपरिषद आणि शिराळा नगरपंचायतीची निवडणूक लढविण्याच्या तयारीत महाडिक बंधू आहेत. राष्ट्रवादीविरोधी गट एकत्र आले नाहीत तर महाडिक गट स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत महाडिक बंधूंनी दिले आहेत.
इस्लामपूर नगर पालिकेत सत्ताधारी विकास आघाडीबरोबर महाडिक गट आहे. त्याचबरोबर शिवसेना स्वतंत्रपणे विकास आघाडीबरोबर आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात पुन्हा विकास आघाडीची बांधणी करण्याचा विचार पुढे येत असला तरी आजही या आघाडीमध्ये अंतर्गत मतभेद आहेत. त्यामुळे आगामी इस्लामपूर पालिका निवडणूक युवा शक्तीच्या माध्यमातून लढविण्याची भाषा महाडिक बंधू करत आहेत. त्याचप्रमाणे आष्टा पालिकेत विलासराव शिंदे यांच्या निधनानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा गट एकाच छताखाली आला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीविरोधी असलेल्या सर्वच गटांना एकत्रित करण्याच्या हालचाली महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून सुरू आहेत.
गत विधानसभा निवडणुकीनंतर महाडिक बंधू भाजपच्या झेंड्याखाली कार्यरत आहेत. परंतु शिराळा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि सत्याजित देशमुख यांचे गट आजही महाडिक गटाशी आंतर ठेवून आहेत. त्यामुळे सम्राट महाडिक यांनी आपला गट स्वतंत्रपणे बळकट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नाईक आणि देशमुख गटाने जुळवून घेतले नाही तर शिराळा नगर पंचायत स्वतंत्रपणे लढविण्याचा विचार सम्राट महाडिक यांनी बोलून दाखविला आहे. एकंदरीत भाजपमधील सर्वच गट एकत्रित आले नाहीत तर आगामी पालिका आणि नगरपंचायत निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा सध्यातरी महाडिक युवा शक्तीचा दिसतो.