राज्यातील बाजार समित्यांना आले कत्तलखान्याचे स्वरूप
By Admin | Updated: September 28, 2015 23:47 IST2015-09-28T22:02:30+5:302015-09-28T23:47:55+5:30
राजू शेट्टी : सांगलीतील चर्चासत्रात केली टीका

राज्यातील बाजार समित्यांना आले कत्तलखान्याचे स्वरूप
सांगली : बाजार समित्या या शेतकऱ्यांसाठी विकासाची मंदिरे बनायला हवी होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी या समित्या कत्तलखाने बनल्याचे दिसून आले, अशी टीका स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी सांगली बाजार समितीच्या चर्चासत्रात केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांसाठीच बाजार समित्या स्थापन झाल्या आहेत, मात्र व्यापारी आणि दलालांच्या फायद्यात शेतकरीच दुर्लक्षित राहिला. नाशिकसारख्या ठिकाणी यंत्रणेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना रिंगण करून मारले जाते. विक्री व्यवस्थेतच आपण कमी पडल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये आणि व्यापारी-हमालांमध्ये भांडण सुरू झाले.
बाजार समितीच्या संचालकांनी जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे की नाही, याची पाहणी केली पाहिजे. सांगली बाजार समितीमध्ये आम्ही आमचे प्रतिनिधी पाठविले आहेत. निश्चितच सांगलीची बाजार समिती राज्यातच नव्हे, तर देशात एक नवा आदर्श निर्माण करेल. बाजार समित्यांची व त्यातील व्यापारी, हमाल, तोलाईदार अशा सर्वच घटकांची वकिली आम्ही करायला तयार आहोत, पण शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय न करण्याची आमची अट असेल.
सदाभाऊ खोत म्हणाले की, शेतकऱ्यांच्याच जिवावर सगळे अवलंबून आहेत. आजवर या शेतीमालावर अवलंबून असलेल्या सर्व लोकांच्या हाती पैसा आला, मात्र शेतीमालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती एंडोसल्फानची बाटली आली. या घटकापैकी कुणीही आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही, मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या वारंवार घडताहेत. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, शंकरराव गायकवाड, गोपाळ मर्दा यांनीही चर्चासत्रात मार्गदर्शन केले.
यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष पाटील यांनी स्वागत, तर प्रास्ताविक जीवन पाटील यांनी केले. पृथ्वीराज पवार, विक्रम सावंत, प्रकाश पाटील, कुमार पाटील, बाळू बंडगर, विकास मगदूम, जि. प. सदस्या संयोगीता कोळी, निगोंडा हुल्याळकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चर्चासत्र बाजार समितीचे, चर्चा मंत्रीपदाची...
बाजार समितीने विविध प्रश्नांवर चर्चासत्र आयोजित केले असले तरी, या चर्चासत्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या मंत्रीपदाचीच अधिक चर्चा झाली. सदाभाऊ मंत्री झाल्याशिवाय बाजार समित्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. ते पणनमंत्रीच होतील, असे मत जीवन पाटील यांनी व्यक्त केले. त्यानंतर दिनकर पाटील यांनीही सदाभाऊंच्या मंत्रीपदाचा मुद्दा मांडला. सदाभाऊंना मंत्रीपद मिळाले, तर त्यांना पणन खातेच मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या सर्व गोष्टींची दखल घेत सदाभाऊंनी, आपण मंत्रिमंडळात असलो किंवा नसलो तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत राहू, असा निर्धार व्यक्त केला.
खाटिक
आणि बळीचे
बकरे
बाजार समित्या या शेतकऱ्यांसाठी कत्तलखाने बनल्या आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला, तर सदाभाऊ खोत यांनीही अशाच पद्धतीची टीका केली. खाटिकाच्या हातून बकरे सुटले, तर आनंद बकऱ्यालाच होणार आहे, खाटिकाला नाही. शेतकऱ्याला नेहमीच बळीचा बकरा बनविले जाते, असे मत खोत यांनी व्यक्त केले.