राज्यपालांकडून घटनेची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST2021-06-16T04:36:14+5:302021-06-16T04:36:14+5:30
सांगली : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून सहा ...

राज्यपालांकडून घटनेची पायमल्ली
सांगली : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून सहा महिने झाले तरीही त्यांनी ती मंजूर न करता राजकारण चालू केले आहे. घटनेची पायमल्ली करण्याचेच हे धोरण आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी सांगलीत केली.
राज्यपाल नियुक्त सदस्यांचा मुद्दा सहा महिन्यांपासून चर्चेत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी प्रत्येकी चार याप्रमाणे बारा सदस्यांची यादी राज्यपालांना दिली. मात्र, अद्याप यादीला मंजुरी मिळालेली नाही. यावर शेट्टी यांनी भूमिका मांडली.
ते म्हणाले की, एखाद्याने राज्यपालपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राजकीय पक्षाची झूल बाजूला ठेवून राज्याच्या हिताचा कारभार करणे अपेक्षित आहे. आजपर्यंतच्या राज्यपालांनी असे राजकारण कधीच केले नव्हते. विरोधकांकडून यादी आली तर त्यालाही तत्काळ मंजुरी दिली होती. आताच हा वाद राज्यपालांनी कशासाठी निर्माण केला आहे, हे त्यांनाच माहीत; पण निकोप राजकारणासाठी हा वाद बरा नव्हे. राजभवनाला एवढे संरक्षण असताना यादी गायब होते, असे म्हणणे हे सामान्य जनतेला न पटणारे आहे. असे राजकारण सुरू झाल्यास लोकशाहीवरील विश्वास उडेल. सत्ताधारी आणि विरोधकांनी ठरावीक मर्यादेपर्यंत राजकारण करण्याची गरज आहे. लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करणेही योग्य नाही.
चौकट
केंद्राच्या इशाऱ्यावरूनच यादी थांबविली
राज्यपालांनी बारा आमदारांच्या निवडीची यादी थांबविण्यामागे केंद्र सरकारमधील बड्या नेत्यांचाही हात आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपालांची तक्रार करून प्रश्न सुटेल, असे मला वाटत नाही. विरोधकांनी एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण करू नये, अशी टीकाही शेट्टी यांनी केली.