पलूस, कडेगावच्या क्रीडा संकुलाची कामे मार्गी लावू

By Admin | Updated: September 6, 2015 22:50 IST2015-09-06T22:50:01+5:302015-09-06T22:50:01+5:30

पतंगराव कदम : आढावा बैठकीत अद्ययावत सुविधांचे आश्वासन

Follow the work of Palus, Khegaon Sports Complex | पलूस, कडेगावच्या क्रीडा संकुलाची कामे मार्गी लावू

पलूस, कडेगावच्या क्रीडा संकुलाची कामे मार्गी लावू

कडेगाव : पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यांच्या क्रीडा संकुलाची रखडलेली कामे मार्गी लावणार आहे. तसेच दोन्ही संकुलांमध्ये खेळाडूंसाठी अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण करणार आहे, असे या दोन्ही संकुल समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले.कडेगाव येथे जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक तसेच क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत क्रीडा संकुलाच्या कामाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आ. पतंगराव कदम बोलत होते.पतंगराव कदम म्हणाले की, वांगी येथील कडेगाव तालुका क्रीडा संकुलात ६५ लाख रुपये खर्चून ४०० मीटरचा धावणे मार्ग, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल आदी मैदाने झाली आहेत. या कामाची पाहणी करून यातील काही उणिवा दूर करणार आहे. याशिवाय आणखी काही सुविधा येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. कडेगाव तालुका क्रीडा संकुलासाठी ६४ लाख रुपये खर्चून अद्ययावत बॅडमिंटन हॉल, कार्यालय, शौचालय आदी कामे होणार आहेत.पलूस तालुका क्रीडा संकुलासाठी २ कोटी ३३ लाख रुपये तांत्रिक मान्यतेची कामे सुरू होणार आहेत. यापैकी ९० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातून ४०० मीटर धावण मार्ग, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, प्रवेशद्वार आदी कामे करण्यात येणार आहेत.दोन्ही तालुक्यांच्या क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, तसेच येथे विविध खेळांच्या स्पर्धा, खेळाडूंच्या नियमित सरावाच्यादृष्टीने नियोजन करावे, यासाठी मार्गदर्शन घेणार आहे, असे सांगून, या दोन्ही क्रीडा संकुलांची मंजूर असलेली कामे तातडीने सुरू करावीत आणि त्याबाबतचा अहवाल द्यावा, अशा सूचना पतंगराव कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. (वार्ताहर)

नवीन अध्यादेशानुसार आमदार अध्यक्ष
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नव्या अध्यादेशानुसार तालुका क्रीडा संकुल समितीच्या अध्यक्षपदी संबंधित तालुक्याचे आमदार यांची निवड करावी व आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी, असे आदेश आहेत. याप्रमाणे पलूस व कडेगाव तालुका क्रीडा संकुल समितीच्या अध्यक्षपदी आ. पतंगराव कदम यांची निवड झाली आहे.

Web Title: Follow the work of Palus, Khegaon Sports Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.