विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह सांगलीत पाऊस
By Admin | Updated: June 5, 2014 00:21 IST2014-06-05T00:20:13+5:302014-06-05T00:21:13+5:30
शेतकर्यांतून समाधान व्यक्त

विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह सांगलीत पाऊस
सांगली : विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मिरज तालुक्यासह सांगली शहराला पावसाने रात्री झोडपून काढले. रात्री ८.३० वाजता सुरु झालेला पाऊस जवळपास दीड तास सुरुच होता. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी रात्रीही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत आहे. काही शेतकर्यांनी खरीप पेरणी पूर्व मशागती करून जमीन पेरणीसाठी सज्ज ठेवली आहे. तोपर्यंत बुधवारी दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या सांगली शहरातील जनतेला रात्री सुरु झालेल्या पावसाने दिलासा दिला आहे. जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे लहान मुलांमध्ये घबराट निर्माण झाली होती. रात्री साडेआठच्या सुमारास सुरु झालेला पाऊस जवळपास दीड तास सुरुच होता. शहराच्या सखल भागात पाणी साचून होते तर गुंठेवारी भागात दलदल निर्माण झाली होती. मिरज तालुक्यासह जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत आहे. वाळवा, पलूस तालुक्यातील शेतकर्यांनी सोयाबीनची टोकण केली असून शिराळा तालुक्यात धूळवाफेची भात पेरणी केली आहे. या पिकांना हा पाऊस उपयुक्त असल्याचे शेतकर्यांतून बोलले जात आहे. (प्रतिनिधी)