सांगली जिल्ह्यातील महापूर ओसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST2021-07-28T04:27:07+5:302021-07-28T04:27:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुरातून मंगळवारी अनेक रस्ते, वस्त्या, बाजारपेठा मोकळ्या झाल्या. अनेक मार्गांवरील ...

The floods in Sangli district are receding | सांगली जिल्ह्यातील महापूर ओसरतोय

सांगली जिल्ह्यातील महापूर ओसरतोय

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुरातून मंगळवारी अनेक रस्ते, वस्त्या, बाजारपेठा मोकळ्या झाल्या. अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्ववत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पूर ओसरण्याची गतीही वाढत असल्याने येत्या दोन दिवसांत पाणी नदीपात्रात जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात महापुरामुळे दोन लाखांवर नागरिक स्थलांतरित झाले होते. पूर ओसरत असल्याने नागरिक आता घराकडे परतत आहेत. घरांच्या साफसफाईसही सुरुवात झाली आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी मंगळवारी रात्री ४७.५ फुटांपर्यंत खाली आली. त्यामुळे सांगली ते इस्लामपूर मार्ग खुला झाला. सांगली ते अंकली मार्गावर अद्याप पाणी असले तरी, अवजड वाहने व दुचाकींची ये-जा सुरू झाली आहे. रात्री उशिरा याठिकाणचे पाणी पूर्णपणे ओसरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मंगळवारी सर्वत्र पावसाने उघडीप दिली होती.

धरण क्षेत्रातील पावसाचा जोरही ओसरल्याने पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. वारणा धरणातून काही प्रमाणात विसर्ग कमी झाला आहे. सध्या ७ हजार ९८० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोयनेतील विसर्ग ३३ हजार ४८८ इतका आहे. दुसरीकडे अलमट्टीतील विसर्ग अद्याप कायम आहे. त्यामुळे पूर ओसरण्याची गती येत्या दोन दिवसात वाढण्याची चिन्हे आहेत.

चौकट

सांगलीतील हे भाग झाले रिकामे

शहरातील मीरा हौसिंग सोसायटी, इंद्रप्रस्थनगर, रतनशीनगर, आमराई, वखारभार, गवळी गल्ली, पटेल चौक, राजवाडा, स्टेशन रोड, टिळक चौक, हरभट रोड, गणपती पेठ, गणपती मंदिर परिसर, कापड पेठ, गावभाग, सांगलीवाडीतील काही भाग, कोल्हापूर रोड या भागातील पाणी ओसरले आहे. मारुती रोडवर अद्याप थोडे पाणी असले तरी, रात्री उशिरा ते ओसरण्याची चिन्हे आहेत.

चौकट

भिंत कोसळली पेवात

सांगलीवाडी येथील पूरग्रस्त लक्ष्मण पाटील यांच्या घराची महापुराने खचलेली भिंत शेजारी असलेल्या पेवात कोसळली. हा पेवसुद्धा मुजविण्यात आला होता, मात्र महापुराने रस्ता खचून तो पूर्ववत झाला.

चौकट

दुकाने, घरांचे मोठे नुकसान

पूर ओसरल्यानंतर दुकाने, घरांमधील साहित्याच्या नुकसानीचे चित्र पाहून पूरग्रस्तांना धक्का बसला. दुकानांमधील फर्निचर व अन्य मालाचे नुकसान झाले असून, घरांमधील धान्य, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचरचेही नुकसान झाले आहे.

Web Title: The floods in Sangli district are receding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.