महापूर व अतिवृष्टीमुळे ४२ हजार हेक्टर शेतीक्षेत्र उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST2021-07-27T04:28:19+5:302021-07-27T04:28:19+5:30

शिराळा येथे मोरणा नदीच्या पुरात सिद्धार्थ नलवडे यांची केळीची बाग उद्ध्वस्त झाली. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या आठवडाभरातील ...

Floods and heavy rains have destroyed 42,000 hectares of farmland | महापूर व अतिवृष्टीमुळे ४२ हजार हेक्टर शेतीक्षेत्र उद्ध्वस्त

महापूर व अतिवृष्टीमुळे ४२ हजार हेक्टर शेतीक्षेत्र उद्ध्वस्त

शिराळा येथे मोरणा नदीच्या पुरात सिद्धार्थ नलवडे यांची केळीची बाग उद्ध्वस्त झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या आठवडाभरातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे एक लाख शेतकऱ्यांची पीकहानी झाली आहे. ४२ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. विशेषत: ऊस, सोयाबीन आणि पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या नजरा आता पंचनामे आणि नुकसान भरपाईकडे लागल्या आहेत. नदीकाठच्या शेतीत शेतकऱ्यांची सधन शेती पुराच्या तडाख्यात नष्ट झाली आहे. नदीकाठची पिकाऊ मळीची माती वाहून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांची काठावरची शेती वाहून गेली आहे. हजारो एकरमधील ऊसाच्या सुरळीत पाणी शिरल्याने रोपे मेली आहेत. आठवडाभरापेक्षा जास्त काळा ऊस पाण्यात राहिल्याने तो पुन्हा उभा राहण्याची शक्यता नाही. पलूस, वाळवा, मिकज या ऊसक्षेत्राच्या तालुक्यात हे नुकसान गंभीर स्वरुपाचे आहे.

कृषी विभागाने नजर अंदाजाने नुकसानीची तीव्रता स्पष्ट केली आहे. तालुकानिहाय हानी अशी : मिरज तालुक्यात ११ हजार हेक्टर, वाळव्यात १४ हजार, शिराळ्यात ७ हजार, पलुसमध्ये १० हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामध्ये बागायत २४ हजार, जिरायत १५ हजार आणि फळपिके तीन हजार हेक्टर शेतीची हानी झाली आहे.

चौकट

२३ हजार हेक्टरवरील ऊस पाण्याखाली

चार तालुक्यांत २३ हजार हेक्टर ऊस पाण्याखाली गेला आहे. पुराचे पाणी नदीकाठी किमान आठवडाभर राहणार आहे, त्यात बुडालेला ऊस पुन्हा फुलण्याची शक्यता नाही.

चौकट

गुंठेवारी शेतकरी झाले भूमीहीन

नदीकाठी अनेक शेतकऱ्यांची पाच-दहा गुंठ्यांची शेती आहे. महापुरात पाण्याच्या प्रचंड वेगाने नदीकाठ कातरला गेला, त्यामुळे पाच-दहा गुंठ्यांची शेतीही त्यात नाहीशी झाली. आता हे शेतकरी चक्क भूमीहीन झाले आहेत. सातबारा उताऱ्यांवर शेती नोंद असली तरी प्रत्यक्षात मात्र ती दिसेना झाली आहे.

कोट

सध्याचा नुकसानीचा अंदाज नजरपाहणीनुसार आहे. प्रत्यक्ष पंचनामे सुरू होतील तेव्हा तो कमी-जास्त होऊ शकते. नुकसानीचा अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठवला आहे.

- बसवराज मास्तोळी, जिल्हा कृषी अधीक्षक.

Web Title: Floods and heavy rains have destroyed 42,000 hectares of farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.