वारणेच्या पुराचे पाणी पुन्हा पात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST2021-07-28T04:27:40+5:302021-07-28T04:27:40+5:30
कोकरुड : शिराळा पश्चिम भागात आठ दिवसांपूर्वी आलेले पुराचे पाणी पुन्हा नदी पात्रात गेले आहे. काेल्हापूर जिल्ह्यास जाेडणारे चारही ...

वारणेच्या पुराचे पाणी पुन्हा पात्रात
कोकरुड : शिराळा पश्चिम भागात आठ दिवसांपूर्वी आलेले पुराचे पाणी पुन्हा नदी पात्रात गेले आहे. काेल्हापूर जिल्ह्यास जाेडणारे चारही पूल वाहतुकीस खुले झाले आहेत. मात्र, पुराच्या पाण्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नदीकाठची पिके तांबडी पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्याने दाणादाण उडविलेली होती. मंगळवारी सकाळी पश्चिम भागातील नदीचे पाणी कमी होऊन नदी पात्रात गेले. आरळा-शितुर, चरण-सोंडोली, कोकरुड-रेठरे, बिळाशी- भेडसगाव हे चार ही पूल वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. वारणा नदीचा पूर आलेल्या आरळा, सोनवडे, मराठवाडी, काळुद्रे, पणुब्रे वारुण, चरण, मोहरे, नाठवडे, शेडगेवाडी, खुजगाव, चिंचोली, कोकरुड येथील घरांमधील पाणी कमी झाल्याने बाधित कुटुंबांनी स्वच्छतेची सुरुवात केली आहे. पुराच्या पाण्याने नदी काठी असणारी मका, ऊस, सोयाबीन आदी पिके तांबडी पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्याने ग्रामपंचायतींनी गावात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.