इस्लामपूर येथे ‘गुडमॉर्निंग’चा फज्जा
By Admin | Updated: June 4, 2015 00:01 IST2015-06-03T23:07:11+5:302015-06-04T00:01:12+5:30
कारवाईची गरज : मोकळे भूखंड, शाळेच्या मैदानांचा शौचासाठी वापर

इस्लामपूर येथे ‘गुडमॉर्निंग’चा फज्जा
अशोक पाटील -इस्लामपूर शहरातील मुख्य रस्त्याच्या एका बाजूला मोठी शिक्षण संस्था, तर दुसऱ्या बाजूला उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. या दोन्हीच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या भूखंडाचा वापर परिसरातील नागरिक शौचालय म्हणून करत आहेत. याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागाने गुडमॉर्निंग पथकाच्या माध्यमातून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली होती. आता गुडमॉर्निंग पथकेच गायब झाली आहेत.
वाळवा तालुक्यातील सर्वच गावे निर्मलग्राम करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक पातळीवर प्रयत्न करण्यात आले. ग्रामसेवक, तलाठी, तसेच स्थानिक पदाधिकारी यांची पथके तयार करण्यात आली होती. त्यांना ‘गुडमॉर्निंग पथक’ असे नाव देण्यात आले होते. ही पथके दररोज पहाटे तालुक्यातील गावागावात जाऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करत. प्रत्येकी १२०० रुपये दंड आकारला जात होता. या पथकाचा धसका घेतल्याने अनेकांनी स्वत:ची शौचालये बांधली. शासनाच्या अनुदानामुळेही यामध्ये भर पडली. सध्या तालुक्यातील ९० टक्के गावांमध्ये प्रत्येकाची शौचालये आहेत. परंतु इस्लामपूरसारख्या शहरातील नागरिक अजूनही उघड्यावर शौचास बसतात, ही बाब खेदाचीच म्हणावी लागेल.
इस्लामपूर पालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभी केली आहेत. सद्गुरू आश्रमशाळेसमोरही सार्वजनिक शौचालय उभे केले आहे. परंतु याचा वापर परिसरातील नागरिक करत नाहीत. या परिसरातील कासेगाव शिक्षण संस्थेसाठी आरक्षित केलेल्या खुल्या भूखंडावरच अनेकजण उघड्यावर शौचास बसत असल्याचे चित्र आहे.
अशीच परिस्थिती शहरातील विविध खुल्या भूखंडांची झाली आहे. जिल्हा परिषद शाळा क्र. १ समोरील शासकीय क्रीडांगण, उरुण परिसरातील स्मशानभूमीनजीक असलेला खुला परिसर, महादेवनगरातील मोकळे भूखंड, सांगली रस्त्यावर शेतकऱ्यांच्या उभारलेल्या प्रतिकृतीच्या परिसरातही अनेक नागरिक उघड्यावर शौचास बसत आहेत. दुर्गंधी, तसेच मोकाट जनावरांचा वावर यामुळे शहरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.
याविरोधात नगरपालिकेत तक्रारी करूनही याची दखल आरोग्य विभागाने घेतलेली नाही. यामुळे सर्व स्तरातून नाराजीचा सूर उमटत आहे. आता शहरातही नव्याने ‘गुडमॉर्निंग’ पथके नेमून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
घरी वातानुकूलित शौचालय, तरीही...
यापूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागाने अनेकदा गुडमॉर्निंग पथकाच्या माध्यमातून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली होती.
सार्वजनिक शौचालयाचा वापर परिसरातील नागरिक करत नाहीत. शहरातील काही नामवंत पदाधिकारी अजूनही मोकळ्या वातावरणात शौचास जातात. स्वत:च्या घरात वातानुुकूलित शौचालये असूनही ते त्याचा वापर करत नाहीत, याचीही चर्चा शहरातून नेहमीच रंगताना दिसते.
त्यांच्यावर कोणते गुडमॉर्निंग पथक कारवाई करणार, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
दंडात्मक कारवाईही केली जात होती. मात्र राजकीय वरदहस्ताने या पथकांचीही नंतर कुचंबणा होऊ लागली.
पालिकेने लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभी केली आहेत. सद्गुरू आश्रमशाळेसमोर सार्वजनिक शौचालय उभे केले आहे.