लक्ष्मीपूजनानिमित्त बाजारपेठेत झुंबड

By Admin | Updated: October 23, 2014 22:55 IST2014-10-23T21:14:25+5:302014-10-23T22:55:01+5:30

रस्ते गर्दीने फुलले : फटाके, मिठाई आणि पूजा साहित्याला मागणी

The flag of the market for Lakshmi Puja | लक्ष्मीपूजनानिमित्त बाजारपेठेत झुंबड

लक्ष्मीपूजनानिमित्त बाजारपेठेत झुंबड

सांगली : लक्ष्मीपूजनानिमित्त पूजासाहित्य खरेदीसाठी आज (गुरुवार) सकाळपासूनच शहरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. दुपारी साडेचारनंतर लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्यामुळे नारळाच्या झावळ्या, ऊस, फळे, पूजासाहित्य, केळीचे खुंट, कोहळा आदींची विक्री करण्यासाठी शहर व परिसरातील विक्रेत्यांनी मारुती रस्ता संपूर्णपणे व्यापून टाकला होता. त्याचप्रमाणे बाजारपेठेतील सर्वच मिठाई दुकानात ग्राहकांच्या रांगा असल्याचे चित्र होते. फटाके स्टॉलवरही गर्दी होती.
लक्ष्मीपूजेसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासून बाजारपेठेत गर्दी केली होती. शहरातील दत्त-मारुती रस्ता, हरभट रस्ता, स्टेशन चौक रस्ता, वखारभाग गर्दीने फुलून गेला होता. वाढती गर्दी लक्षात घेऊन मारुती रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. बाजारपेठेत पूजा साहित्याला सर्वाधिक मागणी होती. केळीचे खुंट (६० रुपयांना दोन), नारळाच्या झावळ्या (४० रुपयांना दोन), ऊस (२० रुपयांना दोन), कोहळा (३० ते ५० रुपये), आंब्याचे डहाळे (१० रुपये), पूजेकरिता लागणारी पाच फळे (३० रुपये) नारळ (१५ ते २० रुपये), केरसुणी (२० रुपये) यांची चांगली विक्री झाली. हे साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती. पूजा साहित्याचा पुडा ६० रुपयांना विक्रीस उपलब्ध होता. यामध्ये हळदी-कुंकू, खारीक, बदाम, सुपारी, खोबरे, धने, चिरमुरे, कापूर, कापसाच्या वाती, बत्तासे, चिरमुरे आदींचा समावेश होता. पूजेकरिता जरबेरा, कमळ, गुलाब आदी फुले १५ ते २० रुपयांना विक्रीस होती. लक्ष्मीपूजनानंतर नैवेद्याकरिता मिठाई, तसेच फराळाचे तयार पदार्थ घेण्यासाठी मिठाईच्या दुकानांत गर्दी होती. पेढे (३६० रुपये ते ४२० रुपये किलो), मलई व काजू मिठाईला (३७० ते ४८० रुपये किलो) अधिक मागणी होती.
गणपती पेठेतील परवानाधारक फटाका विक्रेते, तसेच तरुण भारत क्रीडांगण व विश्रामबाग येथील नेमिनाथनगर येथे असलेल्या फटाके स्टॉलवर गर्दी दिसत होती. (प्रतिनिधी)

लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत बेंगलोर येथून फ्रैगरी नामक फुलांचे हार पन्नास रुपयांना विक्रीस आले आहेत. ही फुले चॉकलेटी व पिवळ्या रंगात असून साधारणत: आठ महिने ही फुले कोमेजत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
बाजारपेठेत साधी व संस्कार भारतीची रांगोळी खरेदीसाठी गर्दी होती. सामान्यांना परवडतील अशा १० ते २० रुपयांच्या पाकिटात ही रांगोळी विक्रीस उपलब्ध होती.

Web Title: The flag of the market for Lakshmi Puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.