लक्ष्मीपूजनाच्या साहित्य खरेदीसाठी झुंबड
By Admin | Updated: October 23, 2014 00:05 IST2014-10-22T22:14:11+5:302014-10-23T00:05:15+5:30
बाजारपेठ फुलली : फुलांच्या खरेदीसाठी सांगलीत गर्दी, मागणी वाढल्याने झेंडू ६० रुपये किलो

लक्ष्मीपूजनाच्या साहित्य खरेदीसाठी झुंबड
सांगली : लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. पूजेचे साहित्य, फळे आणि फुलांच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती. येथील कापड पेठ, दत्त-मारुती रोड, सराफ कट्टा आदी रस्त्यावर विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. दरम्यान, आज झेंडू फुलांचा दर ६० रुपये किलो होता.
येथील रिसाला रोड, शिवाजी मंडई, कापड पेठ, दत्त-मारुती रोड, विश्रामबाग, गणपती पेठ आदी रस्त्यांवर फुले विक्रेत्यांनी फुलांचे ढीग लावले आहेत. आष्टा, वाळवा, तुंग या परिसराबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आपली फुले विक्रीसाठी याठिकाणी आणली आहेत. सकाळी ७० रुपये किलो असणारा झेंडूचा दर सायंकाळी ६० रुपये किलो झाला होता. नारळाच्या झावळ्या, केळीचे खुंट, ऊस, आंब्याचे डहाळे आदी खरेदीसाठीही गर्दी होती. झावळ्या ५० रुपये, तर केळीचे खुंट ४० ते ५० रुपये जोडी अशी विक्री चालू होती. ऊस जोडी २० रुपये, तर आंब्याचा डहाळा दोन रुपये अशी विक्री सुरु होती.
रांगोळी, पूजेचे साहित्य, फुले खरेदीलाही गर्दी होती. रांगोळी दहा ते वीस रुपये किलो अशी
विक्री सुरु होती. सफरचंद, पेरू, चिक्कू, डाळिंब, कवठ आदी फळांनाही मागणी होती. फळांची विक्री ५० ते ८० रुपये किलो अशी सुरु होती. भेंड, बत्तासे, लाह्या यांच्या विक्रीसाठी विक्रेत्यांनी रस्त्यावर स्टॉल लावले आहेत. सुशोभिकरणासाठी विद्युत माळांनाही आज मागणी होती. विद्युत माळा शंभर रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत विक्रीस होत्या. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत गर्दी होती. (प्रतिनिधी)