चार महिन्यांत पाचवेळा पंचनाम्याची वेळ

By Admin | Updated: March 16, 2015 00:05 IST2015-03-15T23:08:20+5:302015-03-16T00:05:04+5:30

अवकाळीने नुकसान : रविवारी पहाटेपर्यंत पावसाचा मुक्काम, पपई, केळीच्या बागा जमीनदोस्त

Five times a quarter of the time in four months | चार महिन्यांत पाचवेळा पंचनाम्याची वेळ

चार महिन्यांत पाचवेळा पंचनाम्याची वेळ

सांगली : अवकाळी पावसाने खेळ मांडल्याने शेतकरी, बागायतदारांचे गेल्या चार महिन्यांपासून हाल सुरू आहेत. प्रशासकीय पातळीवरही एक पंचनामा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या पंचनाम्याची तयारी करावी लागत आहे. गेल्या चार महिन्यांत पाचवेळा फेरपंचनामे करण्यात आले. यापैकी एका पंचनाम्यातील नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या चार महिन्यात पाचव्यांंदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने प्रशासनाला पाचव्यांदा फेरपंचनाम्याचे आदेश देण्याची वेळ आली आहे. दरम्यान, काल रात्रीपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, दिवसभर उकाडा राहिल्याने बेदाणा, द्राक्ष, डाळिंब बागायतदारांमध्ये धडकी कायम आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी आदी तालुक्यांमध्ये रात्री तुरळक पावसाने हजेरी लावली. शनिवारी खानापूर, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यात विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. खानापूर पूर्व भागात मुसळधार पावसासह गारपीट झाल्याने द्राक्ष बागायतदारांना फटका बसला. जिल्ह्यामध्ये गेल्या चार महिन्यात पाचव्यांदा अवकाळी पावसाने दणका दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, फेब्रुवारी, त्यानंतर मार्चच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात अवकाळीने हजेरी लावली आहे. (प्रतिनिधी)


चार कोटी रुपये नुकसानभरपाई
मार्चच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे पूर्णत्वास आले होते. असे असतानाच दुसऱ्या आठवड्यात पुन्हा अवकाळीने हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वच तालुक्यात पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे यांनी दिली. पहिल्या आठवड्यातील पावसाचे सुमारे आठ हजार पाचशे हेक्टरवरील शेतीपिकाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जादा २ हजार २२६, तर ३ हजार ९१२ हेक्टरवर ५० टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. डिसेंबरअखेर झालेल्या अवकाळीचे पंचनामे पूर्ण झाले असून, याच्या नुकसानभरपाईपोटी शासनाकडून चार कोटी रुपये आले आहेत. याचे वितरणही सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

आळसंदमध्ये रासायनिक खताचे ६ लाखांचे नुकसान
आळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे काल शनिवारी सायंकाळी विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. आळसंद येथील माजी सरपंच प्रकाश यशवंत जाधव यांच्या मालकीचे यशवंत कृषी केंद्राच्या रासायनिक खताच्या गोडावूनचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याने खतांची सर्वच्या सर्व पोती भिजली. त्यामुळे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच वादळी वाऱ्याने परिसरातील अनेक घरांवरील कौले व जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

 

Web Title: Five times a quarter of the time in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.