पाच विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी
By Admin | Updated: February 21, 2015 00:16 IST2015-02-20T23:38:42+5:302015-02-21T00:16:43+5:30
आटपाडीतील प्रकार : समाजकल्याण अधिकारी, ठेकेदारांचे लागेबांधे

पाच विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी
अविनाश बाड - आटपाडी समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील मुलांच्या जेवणाचे ठेकेदार आणि समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये असलेले लागेबांधे उघड झाले आहेत. जेवणाच्या ठेकेदाराविरुद्ध तक्रार केल्याने आटपाडीच्या वसतिगृहातील पाच विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या तोंडावर काढून टाकण्याचा प्रताप या विभागाने केला आहे. काही सामाजिक कार्यकर्ते आणि वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी वसतिगृहासमोर उपोषणाचा इशारा दिल्यानंतर, या पाच विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. यावरून वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या तोंडातील घासावर ठेकेदारासह अधिकारीही डल्ला मारत असल्याचे स्पष्ट झाले आहे.येथील माणगंगा साखर कारखान्याच्या रस्त्यावर कौठुळी फाट्याजवळ समाजकल्याण विभागातर्फे मुलांसाठी आणि मुलींसाठी कोट्यवधी रुपये खर्चून स्वतंत्र वसतिगृहे बांधण्यात आली आहेत. अलीकडे वेगवेगळ्या कारणांमुळे या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी करून आणि आंदोलनाचा इशारा देऊनही परिस्थितीत कायमस्वरूपी सुधारणा होत नसल्याने वसतिगृहातील ठेकेदार आणि कर्मचारी वादग्रस्त ठरले आहेत.
या वसतिगृहात वेळेवर आणि नियमाप्रमाणे जेवण मिळत नाही. निकृष्ट दर्जाची फळे दिली जातात. विद्यार्थ्यांना पुरेसे जेवण मिळत नाही. जेवणाचे चव रजिस्टर ठेवले जात नाही. त्यावर रोजच्या रोज विद्यार्थ्यांच्या सह्या घेतल्या जात नाहीत. महिन्यातून एकदा सह्या घेतल्या जातात. ३ फेबु्रवारी २०१५ रोजी रात्रीच्या जेवणात निकृष्ट बासुंदी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी दुर्गंधी येत असलेली बासुंदी खाण्यास नकार दिला. कारण त्याच कंपनीचे श्रीखंड दि. ३० जानेवारी रोजी खाल्ल्यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली होती. त्यासंबंधी तक्रार घेण्यासाठी अधीक्षक एस. एस. थोरात वसतिगृहात नव्हते, असा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. दि. ३ फेबु्रवारी रोजी बासुंदीबाबत तक्रार करण्यासाठीही गेले असता, अधीक्षक नव्हते. म्हणून भ्रमणध्वनीवरून विद्यार्थ्यांनी अधीक्षक थोरात यांना तक्रार सांगितली. अशी तक्रार करणाऱ्या नेताजी धनाजी भिसे (बी. कॉम. भाग ३), रोहित नामदेव कांबळे (बी. एस्सी भाग ३), ललित लक्ष्मण केंगार (दहावी), अंकुश यशवंत माळी (बारावी) आणि किरण मोहन चंदनशिवे (बारावी) या पाच विद्यार्थ्यांविरोधात भोजन ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला तक्रार अर्ज करायला लावून त्याआधारे या विद्यार्थ्यांचा वसतिगृहातील प्रवेश बेशिस्त वर्तनाखाली रद्द करण्यात आला. यामुळे सर्वच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. ७१ विद्यार्थ्यांनी, ही कारवाई मागे घ्यावी, अन्यथा उपोषणाचा इशारा दिला. मानवता फौंडेशनचे अध्यक्ष सुशीलकुमार मोटे, नंदकुमार कदम आणि महेश काटे या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगलीला जाऊन समाजकल्याण विभागाचे उपायुक्त दीपक घाटे यांची भेट घेतली व आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर निलंबन मागे घेण्यात आले. तसा लेखी आदेश घेऊनच कार्यकर्त्यांनी आटपाडी गाठली.