तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST2021-02-05T07:23:08+5:302021-02-05T07:23:08+5:30
सांगली : कुपवाड येथील साजन रमेश सरोदे (वय २४) या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने ३० पेक्षा जास्त वार करून खून ...

तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा
सांगली : कुपवाड येथील साजन रमेश सरोदे (वय २४) या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने ३० पेक्षा जास्त वार करून खून केल्याप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी निर्णय दिला. सरकारपक्षातर्फे बाळासाहेब देशपांडे यांनी काम पाहिले.
गजानन प्रकाश गवळी (वय २८), बंड्या ऊर्फ नरसगोंडा आदगोंडा चिंचवाडे (३२), हणमंत आनंदा कांबळे (२४, तिघेही रा. उल्हासनगर,कुपवाड), आप्पा ऊर्फ सीताराम पांडुरंग मोरे (२४) आणि मौला अब्दुल मुल्ला (३०, दोघेही रा. कापसे प्लॉट, कुपवाड) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत.
खटल्याची माहिती अशी की, १९ जानेवारी २०१६ रोजी साजन सरोदे हा सायंकाळी साडेसातच्या सुमारास जेवण करून बाहेर जावून येतो म्हणून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर उशीर झालातरी तो परत न आल्याने त्याच्या वडिलांनी चौकशी सुरू केली. यावेळी भीमराव सरोदे व रोहित सरोदे यांच्यासह मयत साजनचे वडील रमेश भारत सूतगिरणीच्या पूर्व बाजूस असलेल्या विहिरीच्या पुढे गेले. यावेळी साजन हा मयत आढळला. यावेळी त्याच्या डोक्यावर, पोटावर, छातीवर व हातावर जखमा होत्या. आरोपींनी ३० पेक्षा अधिक वार केले होते. एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात याची फिर्याद देण्यात आली होती. त्यानुसार आरोपींना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पाटील यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू होती. यात सरकारपक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीच्या आधारे पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दंडाची दीड लाखांची रक्कम मयत साजनच्या वडिलास देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. फितूर साक्षीदारासही नोटीस काढण्यात आली आहे.
चौकट
परिस्थितीजन्य पुरावे ठरले महत्त्वपूर्ण
हा खून रात्रीच्या सुमारास निर्जन ठिकाणी झाल्याने प्रत्यक्षदर्शी पुरावे नव्हते. तरीही परिस्थितीजन्य पुरावा व फितूर न झालेले दहा साक्षीदार व आरोपींनी क्रूरपणे अनेक वार करून खून केल्याने पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.