रेणावी घाटातील खूनप्रकरणी पाच जणांना अटक
By Admin | Updated: September 11, 2015 23:04 IST2015-09-11T23:04:36+5:302015-09-11T23:04:36+5:30
या खुनाचा तब्बल चार वर्षानंतर छडा लावण्यात विटा पोलिसांना गुरूवारी यश आले होते.

रेणावी घाटातील खूनप्रकरणी पाच जणांना अटक
विटा : खानापूर तालुक्यातील रेणावी घाटात चार वर्षापूर्वी घडलेल्या दिराच्या खूनप्रकरणी विटा पोलिसांनी फरारी पाच संशयितांना शुक्रवारी सकाळी अटक केली. त्यामुळे या घटनेतील अटक केलेल्या आरोपींची संख्या सातवर पोहोचली असून या संशयितांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.कर्नाटकातील माणकापूर (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथील शशिकांत ऊर्फ सदाशिव रामचंद्र यादव (वय ३५) या तरुणाचा ४ फेब्रुवारी २०११ रोजी खून झाल्याची घटना घडली होती. या खुनाचा तब्बल चार वर्षानंतर छडा लावण्यात विटा पोलिसांना गुरूवारी यश आले होते. शशिकांतचा खून त्याची भावजय सौ. वर्षा नाईकबा यादव (रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) हिने २० हजाराची सुपारी देऊन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावेळी खुनाची सुपारी हणमंत रामा मगदूम (रा. तारदाळ, ता. हातकणंगले) याला दिल्याचेही वर्षाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गुरूवारी वर्षा हिच्यासह सुपारी घेणारा हणमंत मगदूम या दोघांना अटक केली. त्यावेळी तपासात या प्रकरणातील अन्य साथीदारांची नावेही उघडकीस आली होती.शुक्रवारी सकाळी या घटनेतील मनोज तानाजी जगदाळे (२६), किशोर सुकुमार जगदाळे (२८), पंकज वसंत जोशी (२९, सर्व रा. संगमनगर, तारदाळ, जि. कोल्हापूर), चंद्रकांत मारूती कुरणे (२६, शिवनाकवाडी, शिरोळ) व प्रवीण बाळासाहेब पाटील (२३, रा. जगदाळे मळा, तारदाळ, जि. कोल्हापूर) या पाच संशयितांना अटक केली.
या सर्व संशयितांना पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी विटा न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. १८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पोलीस निरीक्षक मोहन जाधव पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
पोलीस प्रमुखांकडून विटा पोलिसांना बक्षीस
रेणावी घाटातील चार वर्षापूर्वीच्या खुनाचा छडा लावण्यात विटा पोलिसांना यश आले. अत्यंत निर्घृणपणे खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संशयितांनी करूनही विटा पोलिसांनी या खून प्रकरणाचा छडा लावला. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी विटा पोलीस ठाण्यास भेट देऊन या खून प्रकरणाची माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तपासाबाबत काही टिप्स व मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलीस अधीक्षक फुलारी यांनी चार वर्षापूर्वीचा खून उघडकीस आणल्याबद्दल पोलीस निरीक्षक मोहन जाधव व त्यांच्या टीमचे अभिनंदन करून विटा पोलिसांना या तपासाबद्दल बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले.