जिल्ह्यात नव्याने पाच नगरपंचायती
By Admin | Updated: February 21, 2015 23:59 IST2015-02-21T23:55:45+5:302015-02-21T23:59:27+5:30
अधिसूचना जारी : ६ मार्चपर्यंत हरकती घेणार

जिल्ह्यात नव्याने पाच नगरपंचायती
सांगली : जिल्ह्यामध्ये नव्याने खानापूर, कवठेमहांकाळ , आटपाडी, कडेगाव व शिराळा नगरपंचायती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, यासाठी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने अधिसूचना जारी केली आहे. यासाठी आता ६ मार्चपर्यंत हरकती मागवण्यात आल्या असून, त्याच्या सुनावणीनंतर नगरपंचायती अस्तित्वात येणार आहेत.
राज्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यानुसार सांगली जिल्ह्यातील खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव व शिराळा ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली. यासाठी ६ मार्चपर्यंत हरकती घेण्यात येणार असून, या हरकती शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यावर सुनावणी होणार आहे. यानंतर नगरपंचायती अस्तित्वात येणार आहेत.
नगरपंचायतीमुळे स्वच्छता, आरोग्य, शिक्षणासाठी विशेष तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यासाठी नगरविकास खात्याकडून थेट विकास निधीही मिळणार असून, यामुळे विकासाला गती मिळणार आहे. ज्या ठिकाणी आता ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झालेल्या आहेत, तो निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांचा कार्यकाल रद्द होणार आहे. नगरपंचायती अस्तित्वात येण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
याबाबत नगरप्रशासन अधिकारी पंकज पाटील म्हणाले की, या पाच नगरपंचायतींसाठी कालच अधिसूचना जारी केल्या आहेत. पहिल्यांदाच जिल्ह्यात नगरपंचायती होत आहेत. यापूर्वी जिल्ह्यात पाच नगरपालिका झाल्या आहेत. हरकतींवर सुनावणी झाल्यानंतरच नगरविकास खाते निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल, त्यानुसार जिल्हा प्रशासन कार्यवाही करेल. (प्रतिनिंधी)