‘सिंंचन’च्या थकीत वीज बिलाचे पाच हप्ते
By Admin | Updated: March 16, 2017 23:36 IST2017-03-16T23:36:20+5:302017-03-16T23:36:20+5:30
मुंबईतील बैठकीत निर्णय : बिल तात्काळ भरण्याचे आदेश; ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनांचे आवर्तन अडचणीत

‘सिंंचन’च्या थकीत वीज बिलाचे पाच हप्ते
सांगली : जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजना नियमित सुरू राहण्यासाठी थकीत वीज बिलाचे पाच हप्ते करण्याचा निर्णय मुंबईत घेण्यात आलेल्या बैठकीत झाला. वीज बिलाचा हप्ता आणि चालू बिल तात्काळ भरण्याचे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील नेत्यांनी बिले भरण्यास सहमती दर्शविली. मात्र थकबाकी भरली तरच सिंचन योजना पुढे चालू ठेवण्यात येतील, असे मंत्र्यांनी जिल्ह्यातील आमदारांना सांगितल्यामुळे, सिंचन योजनांचे आवर्तन पुढे चालू राहण्यात अडचण निर्माण झाली आहे.
मुंबईत गुरूवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार पतंगराव कदम, आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, आ. मोहनराव कदम, आ. सुमनताई पाटील, अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले उपस्थित होते.
कृष्णा आणि वारणा नदीतून वाहून जाणारे पाणी टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांना दिले जाते. म्हैसाळसाठी दोन टीएमसी, ताकारीसाठी एक टीमसी आणि टेंभूसाठी दीड टीएमसी, असे साडेचार टीएमसी पाणी दिले आहे. सिंचन योजनांच्या वीज बिलांचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. तिन्ही सिंचन योजना नियमित सुरु राहिल्यास भर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने थकीत बिलांबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. सिंचन योजनांच्या बिलासाठी निधी देण्यात यावा, याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. थकबाकीपोटी शासनाकडून निधी देण्याचे जाहीर केले होते, मात्र रक्कम देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा प्रश्न जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित केला.
म्हैसाळ सिंचन योजनेचे २६ कोटी रुपये थकीत बिल आहे. वेळोवेळी मुदत देऊनही ते भरण्यात आलेले नाही. भर उन्हाळ्यात योजना सुरु राहिल्या पाहिजेत, अशी मागणी आ. जगताप यांनी केली. जलसंपदामंत्री महाजन यांनी, थकीत बिलाचे पाच हप्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रत्येक हप्ता सहा कोटीचा असून चालू बिलही त्यासोबत भरण्याच्या सूचना दिल्या. हप्ता भरल्यानंतर योजनेचे आवर्तन कायम सुरु ठेवले जाणार आहे.
टेंभू योजनेची चौदा कोटी, तर ताकारी योजनेची चार कोटी थकबाकी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज बिलांची थकीत रक्कम एकाच टप्प्यात भरता येणार नसल्याचे लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले. थकीत वीज बिलांचे हप्ते केले, तर शेतकऱ्यांचीही सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तिन्ही सिंचन योजनांच्या थकीत बिलांचे पाच हप्ते करण्याचा निर्णय बैठकीत झाला. हप्ता आणि योजनांचे चालू बिल एकाचवेळी भरण्यात यावे, अशा सूचना जलसंपदामंत्री महाजन आणि ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिल्या. जिल्ह्यातील नेत्यांनीही हप्ते भरण्यास सहमती दर्शविली आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. भर उन्हाळ्यात तिन्ही योजना नियमित सुरु राहणे आवश्यक आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरुन मदत केली पाहिजे, अशी भूमिका महाजन यांनी मांडली. त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांत प्रबोधन करावे, असे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांकडून थकीत रक्कम भरण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे. थकबाकी न भरल्यास योजनांचा वीज पुरवठा कोणत्याहीक्षणी खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात सिंचन योजना बंद पडल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
‘आरफळ’चे पाणी जिल्ह्याला मिळणार
कण्हेर (जि. सातारा) धरणातून आरफळ योजनेतून पाणी देण्यात येते. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने पिके करपून चालली आहेत. पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. सांगलीसह सातारा जिल्ह्याला ठरवून दिल्याप्रमाणे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. आरफळ योजनेचे पाणी सांगली जिल्ह्यासाठीही मिळाले पाहिजे, अशी भूमिका आमदार सुमनताई पाटील यांनी मांडली. त्यानुसार आरफळचे पाणी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.