सांगलीत पाचशेवर कंत्राटी कर्मचारी बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST2021-09-15T04:30:21+5:302021-09-15T04:30:21+5:30

सांगली : सांगली जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर ५५० आरोग्य कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात आले. १० ...

Five hundred contract workers unemployed in Sangli | सांगलीत पाचशेवर कंत्राटी कर्मचारी बेरोजगार

सांगलीत पाचशेवर कंत्राटी कर्मचारी बेरोजगार

सांगली : सांगली जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर ५५० आरोग्य कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात आले. १० सप्टेंबर २०२१ पर्यंत सर्वच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले.

हे कर्मचारी कमी केल्यामुळे रुग्णसेवेवर फारसा परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या ३०० हून कमी झाली आहे, त्यामुळे कर्मचारी कमी झाल्याचा फटका बसलेला नाही. मिरज कोविड रुग्णालयातील नियमित कर्मचाऱ्यांवर तेथील अतिरिक्त कोविड केंद्राची जबाबदारी सोपविली आहे.

केस स्टडी

रवींद्र कांबळे हा मिरजेत खासगी रुग्णालयात काम करणारा परिचारक कंत्राटी स्वरुपात नियुक्तीस होता. त्याला मिरज कोविड रुग्णालयात सेवा देण्यात आली होती. पहिल्या लाटेत खासगीमधील नोकरी सोडून शासकीय कोविड रुग्णालयात गेला. पहिली लाट संपताच कार्यमुक्त केले. त्याला याची अपेक्षा नव्हती. नोकरी गेल्याने धक्का बसला. खासगी रुग्णालयातही पुन्हा संधी मिळाली नाही. सुदैवाने दुसऱ्या लाटेत पुन्हा कोविड रुग्णालयात घेतले होते. त्यामुळे सहा महिने रोजगार मिळाला. पण आता पुन्हा सेवा समाप्त केल्याने रस्त्यावर आला आहे. नोकरी पुन्हा-पुन्हा सोडण्याने खासगीमध्येही त्याला संधी मिळेना झाली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत शासनाने बोलाविले, तर जाणार नाही, अशी भूमिका त्याने व्यक्त केली. कमी केलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामाचे पूर्ण मानधन मिळाले आहे, पण त्यांना आता नव्या नोकऱ्या शोधण्यात अडचणी येत आहेत.

कोट

गेल्या दीड वर्षांपासून आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून कोरोना रुग्णांवर उपचार केले. यानिमित्ताने शासकीय कामकाजाचा व आरोग्यसेवेचा चांगला अनुभव आम्हाला आला आहे. नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कार्यक्षमतेने आम्ही काम केले. आता गरज संपल्याने काढून टाकले आहे. दीड वर्षांच्या खंडानंतर नोकरी कोठे मिळणार? असा प्रश्न आमच्यासमोर आहे. शासनाने सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे, त्यामध्ये आम्हाला प्राधान्य द्यावे.

- पुष्कराज कोळी, कंत्राटी परिचारक, मिरज

कोट

शासनाने निधी थांबवल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करावे लागले. जिल्ह्यात कोरोना रुग्ण अद्याप कायम असल्याने आम्हाला मनुष्यबळाची गरज आहे, त्यामुळे कंत्राटींना पुन्हा नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शासन निर्णय घेईल त्यानुसार कार्यवाही केली जाईल.

- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी

Web Title: Five hundred contract workers unemployed in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.