सांगली ‘सिव्हिल’साठी साडेपाच कोटी वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:21+5:302021-02-05T07:24:21+5:30
सांगली : वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयातील विविध कामांसाठी ५ कोटी ३० लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे आदेश वैद्यकीय ...

सांगली ‘सिव्हिल’साठी साडेपाच कोटी वर्ग
सांगली : वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयातील विविध कामांसाठी ५ कोटी ३० लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिल्यानंतर हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
पाटील यांनी सांगितले की, वसंतदादा रुग्णालयात विस्तारित बाह्यरुग्ण विभाग इमारतीचे बांधकाम करणे, मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीचे नूतनीकरण करणे व पाच नवीन वाॅर्डच्या बांधकामासाठी हा निधी दिला आहे. वसंतदादा रुग्णालयाअंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, पाण्याची टाकी, वाहनतळ, अभ्यागत कक्ष, आवार भिंत इत्यादींचे नव्याने बांधकाम या निधीतून होणार आहे. याच ठिकाणच्या सर्व इमारती, बाह्यरुग्ण विभाग, शौचालयांची दुरुस्ती आणि नूतनीकरण, भूमिगत मलनि:स्सारण पाईपलाईन दुरुस्ती आणि रुग्णालयातील सर्व इमारतींची दुरुस्तीसुद्धा होणार आहे.
या कामासाठी २०१७ पासून निधी उपलब्ध होत नव्हता. त्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांच्याकडे मुंबईला जाऊन बैठक घेतली. पुन्हा त्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार नुकताच हा निधी वितरित करण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. सिव्हिलमधील ही सर्व कामे या निधीमुळे सुरू होण्यास मोठी मदत मिळाली आहे.
याशिवाय वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात नव्याने पाचशे खाटांच्या सुविधांसह नवीन इमारत बांधण्यासंदर्भातील प्रस्ताव देशमुख यांच्याकडे दिला असून त्यासाठीही पाठपुरावा चालू असल्याचे पाटील यांनी सांगितले.