दक्षिण अमेरिकेतील मासा सांगलीत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST2021-06-21T04:19:04+5:302021-06-21T04:19:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दक्षिण अमेरिकेतील अमॅझॉन नदीत आढळणारा व मांसाहारी असलेला सकरमाउथ कॅटफिश हरिपूर (ता. ...

दक्षिण अमेरिकेतील मासा सांगलीत आढळला
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दक्षिण अमेरिकेतील अमॅझॉन नदीत आढळणारा व मांसाहारी असलेला सकरमाउथ कॅटफिश हरिपूर (ता. मिरज) येथे आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गंगा, सिंधू नदीनंतर आता कृष्णा नदीतही हा मासा आढळल्याने येथील जलचरांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.
हरिपूर येथील विकास नलावडे या मच्छीमाराला कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मासेमारी करताना सकरमाउथ कॅटफिश आढळून आला. पावसाळा सुरू झाल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीमध्ये मासेमारीचा मोसम सुरू झाला आहे. लालसर पाण्यात अनेक प्रकारचे मासे सध्या सापडत आहेत, मात्र सकरमाउथचे दर्शन झाल्याने धोक्याची घंटा वाजली आहे.
सकरमाउथ कॅटफिशमुळे कृष्णा नदीतल्या माशांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सकरमाउथ कॅटफिश मांसाहारी असतो. त्यामुळे पाण्यातल्या इतर माशांना तो खातो. त्यामुळे येथील जलीय जिवांसमोर धोका निर्माण झाला आहे. सकरमाउथ कॅटफिश वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असतो. हा मासा पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली होती.
चौकट
हरिपुरात आला कसा?
दक्षिण अमेरिकेतील हा मासा सप्टेंबर २०२० मध्ये उत्तर प्रदेशातील रमना गावात गंगा नदीत आढळला. त्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये तो मध्य प्रदेशातील भिंड येथील सिंधू नदीत आढळला. आता हरिपुरात तो आढळला आहे. या तिन्ही नदींमध्ये हा मासा आला कसा? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.