झेडपीचे प्रथमच दोन कोटीचे शिलकी ‘बजेट’

By Admin | Updated: March 11, 2015 00:05 IST2015-03-10T23:33:37+5:302015-03-11T00:05:52+5:30

उद्या सादर होणार : खुल्या प्रवर्गासाठी घरकुल योजना, केशकर्तनालयासाठी खुर्च्या देणार

For the first time in ZW, the balance amount of `2 crore 'budget' | झेडपीचे प्रथमच दोन कोटीचे शिलकी ‘बजेट’

झेडपीचे प्रथमच दोन कोटीचे शिलकी ‘बजेट’

सांगली : जिल्हा परिषदेचा २०१५-१६ चा अर्थसंकल्प गुरुवार, दि. १२ रोजी उपाध्यक्ष तथा अर्थ समिती सभापती लिंबाजी पाटील विशेष सभेत सादर करणार आहेत. ४३ कोटी खर्चाचा, तर दोन कोटी शिलकीचा हा अर्थसंकल्प असणार असून यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि केशकर्तन व्यवसाय करणाऱ्यांना ८० टक्के अनुदानावर खुर्च्यांचे वाटपही करण्यात येणार आहेत. यासह अनेक नवीन योजनांचाही अर्थसंकल्पात समाावेश आहे.जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प विशेष सर्वसाधारण सभेत सादर होणार आहे. लिंबाजी पाटील प्रथमच अर्थसंकल्प सादर करणार असले तरी, त्यांना मागील सात वर्षांचा कामकाजाचा अनुभव असल्यामुळे, अनेक नवीन योजनांचा समावेश त्यांनी केला आहे. सुमारे ४३ कोटींच्या खर्चाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण विभागाला विशेष निधीची तरतूद केली आहे. समाजकल्याण विभागाकडील वसंत घरकुल योजनेच्या धर्तीवरच यशवंतराव चव्हाण घरकुल योजना नव्याने सुरु केली आहे. यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ग्रामपंचायत विभागाकडून चालविण्यात येणार आहे. केशकर्तन व्यवसाय करणाऱ्यांना दहा हजारापर्यंतची खुर्ची खरेदीसाठी अनुदान देण्यासाठी विशेष योजना जाहीर होणार आहे. यासाठी वीस ते पंचवीस लाखापर्यंत निधीची तरतूद केली असून ८० टक्के अनुदानावर सुरु होणार आहे. वीस टक्के रक्कम लाभार्थींना द्यावी लागणार आहे. यासह अन्य योजनांचाही अर्थसंकल्पामध्ये समावेश केला आहे. (प्रतिनिधी)

शिक्षण विभागावरून पुन्हा सभेत वादळी चर्चा
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील ठप्प झालेल्या कारभारावरून विशेष सर्वसाधारण सभा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. कारण, मागील सभेत शिक्षणाधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यावरून चर्चा झाली होती. परंतु, काही सदस्यांनी त्यांना सक्तीने रजेवर न पाठविता कामकाज सुधारण्यासाठी वेळ देण्याचे ठरविले होते. तरीही शिक्षण विभागातील कारभार सुधारला नाही. दरम्यान, शिक्षणाधिकारी सुगता पुन्ने यांनी विनंती बदलीसाठी शासनाकडे अर्ज केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी सांगितले. हे जरी खरे असले तरी, शिक्षण विभागातील कारभारावरून सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title: For the first time in ZW, the balance amount of `2 crore 'budget'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.