कसबे डिग्रजची ‘कृष्णा’ प्रथम
By Admin | Updated: September 22, 2015 00:10 IST2015-09-21T22:56:00+5:302015-09-22T00:10:42+5:30
होड्यांच्या शर्यती : कवठेपिरानची सप्तर्षी दुसऱ्या स्थानी; सांगलीत गर्दी

कसबे डिग्रजची ‘कृष्णा’ प्रथम
सांगली : शिट्ट्या, टाळ्या आणि प्रेक्षकांच्या उस्फूर्त साक्षीने सोमवारी कृष्णा नदीपात्रात चुरशीने होड्या धावल्या. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कृष्णा होडीने सहा किलोमीटरचे अंतर ४१ मिनीटात पार करून प्रथम क्रमांक पटकावला. कवठेपिरानच्या सप्तर्षी होडीला मात्र दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
शिवकल्प ग्रुप आणि सांगली जिल्हा रोर्इंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त कृष्णा नदीपात्रात होड्यांच्या शर्यती पार पडल्या. सांगलीवाडी येथील शंकर घाटावरून स्पर्धेस प्रारंभ झाला. उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आ. सुधीर गाडगीळ व माजी आमदार दिनकर पाटील यांच्याहस्ते निशाण दाखवून झाले. महाराष्ट्र कनोर्इंग कयार्इंग असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रताप जामदार यांनी स्वागत केले. शिवकल्प ग्रुपचे अध्यक्ष योगेश पाटील व उपाध्यक्ष अमित पाटील यांनी संयोजन केले. यावेळी उद्योजक मिलींद पाटील, भरत देशमुख, विजय पाटील, समित कदम, सुनील पाटील, उदय पाटील, उमेश पाटील, विष्णू पाटील, जयसिंग पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धा पाहण्यासाठी आयर्विन पुलावर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. आंतरराष्ट्रीय नौकायन प्रशिक्षक दत्ता पाटील, दीपक पाटील, भरत बर्गे, अमोल बोळाज, वैभव पाटील, अभिनंदन पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.
विजेत्या एक ते तीन क्रमांकांना अनुक्रमे सात, पाच व तीन हजाराचे रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. स्पर्धेचा अंतिम निकाल असा : कृष्णा बोट क्लब, कसबे डिग्रज (प्रथम), सप्तर्षी बोट क्लब, कवठेपिरान (द्वितीय), समडोळी बोट क्लब, समडोळी (तृतीय).