झाडे लावण्यात फस्ट; मात्र जगविण्यात फेल

By Admin | Updated: January 25, 2015 00:44 IST2015-01-25T00:44:41+5:302015-01-25T00:44:41+5:30

सांगली जिल्ह्यातील चित्र : पन्नास टक्के वृक्ष सहा महिन्यात कोमजली

The first to plant trees; But it can not be done to survive | झाडे लावण्यात फस्ट; मात्र जगविण्यात फेल

झाडे लावण्यात फस्ट; मात्र जगविण्यात फेल

अशोक डोंबाळे, सांगली
शतकोटी वृक्ष लागवड योजनेतून जिल्ह्यासाठी ४१ लाख ७५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. यापैकी ४४ लाख ६० हजारांची वृक्ष लागवड करून राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. परंतु, लागवडीनंतर वृक्ष जगविण्याच्याबाबतीत मात्र प्रशासनासह ग्रामपंचायत पदाधिकारी ‘फेल’ झाल्याचे दिसत आहे. लागवड केलेल्या वृक्षांपैकी ५० टक्के रोपे सहा महिन्यातच वाळून गेल्याचे पाहणीवरून स्पष्ट झाले आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि पुणे विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी वृक्ष लागवडीसाठी धडक मोहीम हाती घेतली होती. ग्रामविकास विभागाकडून तर पर्यावरण संतुलित ग्राम योजना राज्यात सुरु केली होती. गावामध्ये शंभर टक्के वृक्ष लागवड आणि पाणीपट्टी, घरपट्टीची ७० टक्केहून अधिक वसुली करणाऱ्या गावांना लाखो रूपयांचे अनुदान दिले जात होते. या योजनेतून सांगली जिल्ह्याला वीस कोटीहून अधिक निधी मिळाला. कागदोपत्री ७०४ गावांपैकी ८० टक्के गावांमध्ये पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबविल्याचे दिसत आहे. अनुदान घेईपर्यंत वृक्ष लागवड करून ती जगविली. परंतु, त्याकडे नंतर ग्रामपंचायतींसह पदाधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केल्यामुळे सध्या या वृक्षांनी माना टाकल्या आहेत. या वृक्षांकडे पाहिल्यानंतर शासनाच्या पर्यावरण समृध्द ग्राम योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.
दुसरी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे शतकोटी वृक्षलागवड. प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून शतकोटी योजना पुढे आली. त्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रभर ती राबविली. या योजनेतून सांगली जिल्ह्याला ४१ लाख ७५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्टही पार केले आहे. चक्क जिल्ह्यात ४४ लाख ६० हजार वृक्षांची लागवड झाली होती. या मोहिमेत इच्छा नसतानाही सर्वच शासकीय कार्यालयांनी सहभाग घेतला होता. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनीही वृक्ष लागवडीसाठी विशेष लक्ष दिले होते. यातूनच जिल्हा वृक्ष लागवडीत राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचला होता. परंतु, वृक्ष लागवडीनंतर ती जगविण्याच्यादृष्टीने कुणीही पाऊल उचलत नसल्याचे दिसत आहे. वन विभागाची वृक्ष लागवड कशापध्दतीने होती, हे तर सर्वांनाच माहीत आहे. वर्षानुवर्षे त्याच त्या खड्ड्यात वृक्ष लावल्यामुळेच वीस वर्षानंतरही डोंगरावर वृक्ष दिसत नाहीत. वन विभागाचे दुर्लक्ष सोडून द्या, पण अन्य विभागांनीही वृक्ष लागवडीनंतर फारसे त्याकडे गांभीर्याने पाहिल्याचे दिसत नाही. म्हणून लागवड झालेल्या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष वाळले आहेत.
वृक्ष लागवड
विभाग वृक्ष लागवड
जिल्हा परिषद १८५५०००
वन विभाग १६७००००
सामाजिक वन २७८०००
अन्य विभाग १६७०००
कृषी ४९००००
एकूण ४४६००००



 

Web Title: The first to plant trees; But it can not be done to survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.