पिंपरी-चिंचवडच्या ‘द कॉन्शन्स’ चा प्रथम क्रमांक
By Admin | Updated: March 3, 2015 23:02 IST2015-03-03T22:58:39+5:302015-03-03T23:02:09+5:30
जयंत करंडक : इस्लामपुरात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

पिंपरी-चिंचवडच्या ‘द कॉन्शन्स’ चा प्रथम क्रमांक
इस्लामपूर : राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी व अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्यावतीने आयोजित जयंत करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या ‘द कॉन्शन्स’ या एकांकिकेने प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला. त्यांना २५ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व जयंत करंडक देण्यात आला.येथील राजारामबापू पाटील नाट्यगृहात तीन दिवस या एकांकिका स्पर्धा झाल्या. राज्यातील ३२ संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता. सांगलीच्या राजेंद्र पोळ सांस्कृतिक प्रतिष्ठानची ‘फुलपाखरु’ ही एकांकिका द्वितीय, तर पुण्याच्या श्री बालाजी आॅन क्रिएशनने सादर केलेल्या ‘घोरपडेंच्या बैलाला घो’ ही एकांकिका तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. त्यांना अनुक्रमे २0 हजार व १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
समन्मित अहमदनगरच्या ‘एक सेल्फी हो जाए’, तर समांतर सांगलीच्या ‘अजूनही चांदरात आहे’, तसेच भारती विद्यापीठ कोल्हापूरच्या ‘गारा’ या एकांकिकेस पाच हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक ‘फुलपाखरु’साठी प्रताप सोनाळे (सांगली) यांना, द्वितीय ‘द कॉन्शन्स’साठी मनोज डाळिंबकर (पुणे), तर तृतीय पुण्याच्या कल्पेश जडीया यांना पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट पुरुष अभिनयासाठीचे प्रणव जोशी (द कॉन्शन्स), ज्ञानेश भिलारे (घोरपडेंच्या बैलाला घो), प्रताप सोनाळे (फुलपाखरु), तर स्त्री अभिनयासाठी धनश्री गाडगीळ (अजूनही चांदरात आहे), स्वरदा बुरसे (एक सेल्फी हो जाए) आणि नेहा शहा (दोघी) यांना पारितोषिक मिळाले. तसेच उत्कृष्ट स्थानिक प्रयोगाचे बक्षीस आर.आय.टी.च्या ‘वाट पहाटेची’ या एकांकिकेस मिळाले.
उद्योजक अभियंता प्रवीण पाटील, प्रा. शामराव पाटील, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कुंभार, रोझा किणीकर, वृषाली आफळे, अलका शहा, सदानंद बोंगाणे यांच्याहस्ते पारितोषिक वितरण झाले. पवन खेबूडकर (कोल्हापूर), नितीन धंदुके (पुणे) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रकाश जाधव, प्रा. संदीप पाटील, शशिकांत कुलकर्णी, उज्ज्वला कदम, योगीता माळी, रज्जाक मुल्ला, गणेश पोतदार, समीर शिकलगार, स्वप्नील कोरे आदींनी संयोजन केले. (वार्ताहर)