जानेवारीचा पहिला पंधरवडा लहरी हवामानाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:49+5:302021-01-08T05:28:49+5:30

सांगली : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सांगलीसह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. ...

The first fortnight of January is windy | जानेवारीचा पहिला पंधरवडा लहरी हवामानाचा

जानेवारीचा पहिला पंधरवडा लहरी हवामानाचा

सांगली : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सांगलीसह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. वेधशाळेने राज्यातील १८ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला असून याठिकाणी पाऊस किंवा गारपिटीची चिन्हे आहेत.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगांची दाटी होत आहे. शनिवारी रात्री सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. नव्या अंदाजानुसार आणखी काही दिवस असे वातावरण राहणार असल्याने जानेवारीचा पहिला पंधरवडा लहरी हवामानाचा राहणार आहे. आठवड्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रात कर्नाटक ते महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. सौराष्ट्र व कच्छ भागात चक्रीवादळास अनुकूल स्थिती आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगतही असेच दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगांची दाटी झाली आहे.

हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यलो अलर्ट म्हणजे सतर्कता व लक्ष ठेवण्याचे आवाहन असते. विजांच्या कडकडाटासह ८ जानेवारीपर्यंत पावसाची चिन्हे आहेत. त्यानंतरही ढगाळ वातावरण राहील. सांगली जिल्ह्यासह उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, सोलापूर, सातारा, पुणे, कोल्हापूर, यवतमाळ, वाशीम, वर्धा, अकोला, नागपूर, बुलडाणा, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याठिकाणी इशारा दिला आहे.

चौकट

तापमानात पुन्हा वाढ

जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३०, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. दोन दिवसांपूर्वी किमान तापमान १७ अंशाखाली गेले होते. आता ते जानेवारीच्या सरासरीपेक्षा ७ अंशाने अधिक आहे. आगामी पाच दिवसात पुन्हा पारा खाली जाणार आहे.

Web Title: The first fortnight of January is windy