कपाटाच्या कारखान्यास आग

By Admin | Updated: May 8, 2016 00:53 IST2016-05-08T00:53:00+5:302016-05-08T00:53:00+5:30

तीन लाखांचे नुकसान : सांगलीत शॉर्टसर्किटने दुर्घटना

Fire to the utensil factory | कपाटाच्या कारखान्यास आग

कपाटाच्या कारखान्यास आग

सांगली : माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील कृपा स्टील फर्निचर या कपाट तयार करण्याच्या कारखान्यास शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता भीषण आग लागली. या आगीत कपाटांना लावण्याचा रंग, कारखान्याचे शेड, तीन कपाट खाक होऊन तीन लाखांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. या घटनेची संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद आहे.
औद्योगिक वसाहतीत प्लॉट क्रमांक सहामध्ये जैनेशकुमार डडानिया यांचा हा कारखाना आहे. याठिकाणी लोखंडी कपाट तयार केली जातात. शुक्रवारी रात्री अकरा वाजता कामगार कारखाना बंद करून जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी कारखान्याच्या पाठीमागून त्यांना धुराचे लोट येत असल्याचे निदर्शनास आले. कामगारांनी मालक डडानिया यांच्याशी संपर्क साधून कारखान्यास आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आग पसरत गेली होती. आजूबाजूच्या कारखान्यांना त्याची झळ लागण्यास सुरुवात झाली होती. सांगलीतील चार, कुपवाड व तासगाव प्रत्येकी एक अशा सहा अग्निशमन दलाच्या गाड्यांनी दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. कारखान्यात सर्वत्र पत्राच असल्याने आग विझविताना जवानांना त्रास झाला. यावेळी अग्निशमन अधिकारी शिवाजीराव दुधाळ स्वत: उपस्थित होते.
आगीत कपाटांना लावण्याचा रंग, कारखान्याचे शेड, तसेच तयार झालेली तीन कपाट, पोटमाळ्यावरील प्लास्टिकचा पत्रा जळून खाक होऊन तीन लाखांचे नुकसान झाले. डडानिया यांचा हा कारखाना खूप मोठा आहे. यामध्ये कपाट तयार करण्याचा एक विभाग व तयार झालेली कपाट ठेवण्याचा असे दोन स्वतंत्र विभाग आहेत. कपाट तयार करण्याच्या विभागात शेवटच्या खोलीत कपाटांना रंग लावले जातात. तिथेच आग लागली. रंगाशिवाय कोणतेही रसायन नव्हते. शिवाय पत्रा व लोखंडी साहित्यच होते. तरीही आग कशी लागली, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय असल्याचे मालक डडानिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नुकसान टळले : आग लागल्याचे कामगारांच्या लवकर लक्षात आले. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही तातडीने आल्या. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, असे मालक डडानिया यांनी सांगितले. ते म्हणाले की, अग्निशमनच्या जवानांनी धोका पत्करुन कारखान्यात प्रवेश करून आग विझविली. त्यांची वेळेत मदत मिळाली नसती, तर खूप मोठे नुकसान झाले असते.

Web Title: Fire to the utensil factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.