घानवडमध्ये टेक्स्टाईल कारखान्याला आग

By Admin | Updated: June 4, 2015 00:01 IST2015-06-03T23:17:19+5:302015-06-04T00:01:12+5:30

शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना : यंत्रसामग्रीसह ६० लाखांचे नुकसान

Fire at textile factory in Ghanwad | घानवडमध्ये टेक्स्टाईल कारखान्याला आग

घानवडमध्ये टेक्स्टाईल कारखान्याला आग

विटा : विट्याजवळच्या घानवड (ता. खानापूर) येथील लकी लार्क टेक्स्टाईल पार्कमधील रामकुमार धोंडिराम जाधव यांच्या मालकीच्या भैरवनाथ टेक्स्टाईल कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याने सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. कापड तयार करण्याची अद्ययावत किमती यंत्रसामग्री, सूत, इलेक्ट्रॉनिक्स ड्रॉगीस यासह सूत व भरलेले बीम आणि तयार तागे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
घानवड येथील रामकुमार जाधव यांचा लकी लार्क टेक्स्टाईल पार्कमध्ये भैरवनाथ टेक्स्टाईल कारखाना आहे. बुधवारी सकाळी कारखाना सुरू असताना अचानक शॉर्टसर्किट झाल्याने सुताच्या बाचक्याने पेट घेतला. यावेळी कारखान्यात सात कामगार काम करीत होते. आग लागल्याचे समजताच कामगार कारखान्यातून बाहेर पडले. आगीने क्षणातच उग्र रूप धारण केले. काही कळायच्या आतच कारखान्यातील कापड तयार करण्याच्या किमती यंत्रसामग्रीने पेट घेतला.
दहा पिकानॉल एअरसेट यंत्रे, दहा इलेक्ट्रॉनिक्स ड्रागीस, सुताची दहा बाचकी, सूत भरलेले १४ बीम व तयार तागे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागताच कामगार व तेथील कारखानदारांनी शेजारच्या शिवाजी कलढोणे यांच्या कारखान्यातील कूपनलिकेमधून पाईपद्वारे पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत विटा नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जाधव यांचे सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून, हवालदार टी. बी. माळी पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Fire at textile factory in Ghanwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.