इंधनाचा टॅँकर पळवणाऱ्यास अटक
By Admin | Updated: November 27, 2014 00:12 IST2014-11-26T23:09:50+5:302014-11-27T00:12:42+5:30
टँकरमधील इंधन चोरीचा प्रयत्न केला; मात्र सील फोडता आले नाही.

इंधनाचा टॅँकर पळवणाऱ्यास अटक
सांगली : येथील पेट्रोल पंपासाठी इंधन पुरवठा करणारा टँकर घेऊन बेपत्ता झालेला रवींद्र विलास चोरमुले (वय २६, रा. आष्टा, ता. वाळवा) यास आज (बुधवार) विश्रामबाग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी अटक केली. चोरमुले हा २१ सप्टेंबरपासून फरारी होता. चोरमुले हा २१ सप्टेंबररोजी सांगलीतील पेट्रोल पंप व वीज मंडळास इंधन पुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये (एमएच ०४, व्हीआय ५१३०) बसून मुंबईहून सांगलीला आला होता. या टँकरमध्ये सुमारे ४० लाख रुपयांचे दोनशे बॅरेल इंधन होते. रविवारी पंप बंद असल्यामुळे टँकरचालक टँकर पंपाशेजारी लावून बाहेर गेला असता, चोरमुले याने टॅँकर सुरूकरून पळवला. काही अंतरावर जाऊन त्याने टँकरमधील इंधन चोरीचा प्रयत्न केला; मात्र त्याला सील फोडता आले नाही. त्यानंतर टँकर रस्त्याकडेला लावून त्याने पलायन केले होते. आज तो आष्टा येथे आला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. यापूर्वी त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत विश्रामबाग पोलिसात नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)