शिगाव : शिगाव (ता. वाळवा) येथील नाईकबा मंदिराजवळ वास्तव्यास असलेल्या ऊसतोड मजुरांच्या वस्तीला मंगळवार, दि. ३० रोजी दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत मोठी हानी झाली. या आगीत तब्बल २० झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या.या घटनेत जीवितहानी टळली असली तरी या आगीत मजुरांचे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केल्याने झोपड्यांमधील धान्य, कपडे, अंथरूण-पांघरूण, भांडी, कागदपत्रे व दैनंदिन वापरातील साहित्य सर्व काही राखेत परिवर्तित झाले. हातावर पोट असलेल्या या कुटुंबांसमोर आता गंभीर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला आहे. लहान मुले, महिला व वृद्ध नागरिक हे सर्वजण उघड्या आकाशाखाली मदतीच्या प्रतीक्षेत उभे आहेत. या घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न झाले; मात्र तोपर्यंत सर्वकाही जळून गेले होते.दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते नीलेश बारवडे यांनी या दुर्घटनेबाबत सर्व नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. “एक गावकरी म्हणून आपण पुढे येणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने थोडी-थोडी मदत केली, तर या कुटुंबांचे आयुष्य पुन्हा सावरू शकते,” असे त्यांनी सांगितले.
Web Summary : A fire in Shigaon destroyed 20 sugarcane worker huts, leaving families homeless. Loss of belongings and livelihood has prompted calls for urgent aid from villagers and social workers. No casualties reported.
Web Summary : शिगाँव में आग लगने से 20 गन्ना श्रमिकों की झोपड़ियाँ जल गईं, जिससे परिवार बेघर हो गए। ग्रामीणों और सामाजिक कार्यकर्ताओं ने तत्काल सहायता की अपील की है। जानहानि की कोई खबर नहीं।