वाळवा : नेर्ले ता. वाळवा येथील आदिती फुड्स इंडिया प्रा. लि. या फळ प्रक्रिया प्रकल्पाच्या निर्यातक्षम मालाच्या गोडावूनला आज, गुरुवार सकाळच्या सुमारास आग लागली. या आगीत गोडावूनमधील संपूर्ण माल जळून खाक झाला. यात कंपनीचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नेर्ले येथे राष्ट्रीय महामार्गालगत अदिती फुड्स इंडिया प्रा लि ही फळ प्रक्रिया करणारी दिनकरराव पाटील ओझर्डेकर यांची कंपनी आहे. यातील मँगो पल्प, टोमॅटो केचप, चॉकलेट आधी सह अन्य पदार्थ निर्यात केले जातात. कंपनीच्या लगत असणाऱ्या पेठ गावच्या हद्दीत येणाऱ्या गोडवूनमध्ये सकाळी कर्मचाऱ्यांना धुराचे लोट दिसले.कर्मचाऱ्यांनी ही बाब मालकांना कळवली. आगीचे रौद्ररूप पाहता संपूर्ण गोडावून आगीने वेढले होते. आग विझवण्यासाठी इस्लामपूर, आष्टा नगरपालिका, राजारामबापू, विश्वास, हुतात्मा किसन अहिर व कृष्णा कारखाना अग्निशमन दल तसेच खासगी पाण्याच्या टँकरनी सलग तीन तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
Sangli: फळांच्या गोडावूनला आग, सुमारे एक कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:21 IST