वित्त आयोगाचा निधी लाटल्यावरून गोंधळ
By Admin | Updated: July 31, 2014 00:06 IST2014-07-31T00:03:06+5:302014-07-31T00:06:31+5:30
जिल्हा परिषद सभा : काँग्रेस सदस्यांच्या आरोपाने पदाधिकारी संतप्त, आयत्यावेळच्या विषयात गोलमालचा आरोप

वित्त आयोगाचा निधी लाटल्यावरून गोंधळ
सांगली : जिल्हा परिषदेला तेराव्या वित्त आयोगातून आलेल्या निधीवरील व्याजाची रक्कम सदस्यांना विश्वासात न घेताच पदाधिकारी आणि राष्ट्रवादी सदस्यांनी लाटल्याचा आरोप काँग्रेसचे सदस्य सूर्यकांत मुटेकर यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केला. यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सदस्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. सदस्यांच्या आरोपावरून पदाधिकाऱ्यांचा पाराही वाढला. अध्यक्ष, उपाध्यक्षांनी आम्ही तो निधी विकास कामांवर खर्च केला असून, तो लाटला नसल्याचे सांगितले.
अध्यक्ष देवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सभेत काँग्रेसचे मुटेकर म्हणाले की, तेराव्या वित्त आयोगातील निधीवरील व्याजाची रक्कम विकास कामासाठी सर्व सदस्यांना देण्याचा निर्णय झाला होता. तरीही तो निधी खर्च करताना आम्हाला विश्वासात का घेतले नाही. तो निधी परस्पर पदाधिकारी आणि काही मोजक्याच सदस्यांनी का लाटला, असा सवाल करून पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर देवराज पाटील, बसवराज पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून ‘लाटले’ या शब्दावर आक्षेप घेतला. आमच्या घरात निधी खर्च केला नाही. सदस्यांनी जपून शब्द वापरावेत, असे त्यांनी सुनावले. राष्ट्रवादी सदस्यांनीही या शब्दावरून काँग्रेसच्या सदस्यांवर टीका केली. शेवटी सदस्य रणधीर नाईक यांनी हस्तक्षेप केला. मुटेकर यांना शब्दश: कोंडीत पकडू नका, त्यांची भावना समजून घ्या, असे आवाहन करून वादावर पडदा टाकला. पवित्रा बरगाले यांनीही याच विषयावरून जाब विचारला. सभेत आयत्यावेळी विषय घुसडून गोलमाल केला जात असल्याचा आरोप सुरेश मोहिते यांनी केला. तसेच जिल्हा परिषद मालकीच्या ६६ जागांपैकी १७ ठिकाणांची अतिक्रमणे काढली नाहीत. याबद्दल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोपही सदस्यांनी केला.
रणधीर नाईक यांनी ग्रामपंचायतीच्या दफ्तरांची वर्षानुवर्षे तपासणीच होत नाही. म्हणूनच लाखो रुपयांचा अपहार होत असल्याचा आरोप केला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी सांगितले की, तपासणी होती का नाही, याची माहिती घेतली जाईल. विस्तार अधिकारी तपासणी करणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
घोटाळ्याप्रकरणी चौकशी समिती नेमली जाते. पण, चौकशीच वेळेत होत नाही. अपहाराची रक्कमही वसूल होत नसल्यामुळे घोटाळे करणाऱ्यांवर प्रशासनाचा अंकुशच राहिला नसल्याचा आरोपही रणधीर नाईक, सुरेश मोहिते यांनी केला. यावर लोखंडे यांनी, तांदुळवाडी पाणी योजनेतील घोटाळा, येळावी (ता. तासगाव) येथील मृतांच्या नावावर लाभ दिल्याचे प्रकरण व पशुसंवर्धन विभागातील औषध साठ्याप्रकरणी केलेल्या कारवाईचा दाखला दिला. (प्रतिनिधी)