...अखेर इस्लामपूर-कामेरी रस्त्याच्या कामास सुरुवात
By Admin | Updated: December 2, 2014 00:19 IST2014-12-01T23:28:39+5:302014-12-02T00:19:42+5:30
लोकमतचा दणका

...अखेर इस्लामपूर-कामेरी रस्त्याच्या कामास सुरुवात
कामेरी : इस्लामपूर-खांबेमळा मार्गे कामेरी रस्त्याचे भाग्य अखेर उजाडले आहे. साडेतीन कि.मी. लांबीच्या या रस्त्यासाठी ६९ लाख रुपयांचा निधी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाल्याने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामासाठी ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.
सुमारे सहा वर्षांपूर्वी प्रथमच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता डांबरी करण्यात आला होता. त्यानंतर एक- दोनवेळा किरकोळ पॅचवर्क वगळता फारशी दुरुस्ती न झाल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते, तर परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीच्या पाईपलाईनसाठी ३ ते ४ ठिकाणी रस्ता खुदाई केली होती. त्यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांना प्रवास करताना कसरत करावी लागत होती.
इस्लामपूरहून कामेरीकडे जाणारा हा रस्ता सर्वात जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, दुचाकी व ऊस हंगामात ट्रॅक्टर व बैलगाड्यांचीही वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या रस्त्याचे काम ठेकेदार बी. डी. पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. (वार्ताहर)