...अखेर विठलापूरचा पाणीप्रश्न मिटला!

By Admin | Updated: May 19, 2015 00:25 IST2015-05-18T23:21:56+5:302015-05-19T00:25:04+5:30

विहिरीचे अधिग्रहण : आजपासून पाणीपुरवठा --लोकमतचा दणका

Finally, the water question of Vithalpur was over! | ...अखेर विठलापूरचा पाणीप्रश्न मिटला!

...अखेर विठलापूरचा पाणीप्रश्न मिटला!

अविनाश बाड - आटपाडी -विठलापूर (ता. आटपाडी) येथील पाणीटंचाईने हैराण झालेल्या ग्रामस्थांना आज (सोमवारी) तातडीने प्रशासकीय हालचाली झाल्याने आता दिलासा मिळणार आहे. विठलापूरला तातडीने विहीर अधिग्रहण केली आहे. यामुळे मंगळवार दि. १९ पासून गावाला पाणी सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे टेंभूचे पाणी सोडलेल्या ओढ्याकाठावरील विहीर अधिग्रहण केल्याने येत्या काही दिवसांपर्यंत तरी गावाची पाणीटंचाईपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे.
आटपाडीपासून केवळ ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या गावाला गेल्या २ महिन्यापासून तीव्र पाणीटंचाईने विळखा घातला होता. १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला गेल्याने ग्रामस्थांवर उन्हाळ्यात दाहीदिशा पाण्यासाठी फिरण्याची वेळ आली. ‘लोकमत’ने सोमवार दि. १८ मे च्या अंकात विठलापूरच्या पाणीटंचाईची वेदना प्रसिध्द केली.
या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यु. एस. काळे, विस्तार अधिकारी एस. आर. पाटील, ग्रामसेवक एस. आर. वळवी, डी. बी. देशमुख यांनी विठलापूरला भेट दिली व प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली.
दरम्यान, तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांनी त्यांच्याकडे प्रस्तावित असलेला विहीर अधिग्रहण करण्याचा आदेश काढला. मात्र त्या विहिरीस पाणी कमी असल्यामुळे सुरेश तुकाराम आटपाडकर यांची विहीर अधिग्रहण करण्याचे ठरले.
दरम्यान, रामभाऊ युवा मंचचे सिध्देश्वर बाड, नवनाथ जावीर, शिवलिंंग बाड, साहेबराव चंदनशिवे, अनिल बाड, बालाजी बाड यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार कट्यारे यांना भेटून, येत्या दोन दिवसात पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात आली नाही, तर बुधवार दि. २० मे रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.


विठलापूर गावच्या ओढ्यातील सर्व विहिरींची पाणी असलेल्या शेतकऱ्याची विहीर अधिग्रहण केली आहे. आम्ही १५ दिवसांपूर्वीच विहीर अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. उद्या तातडीने जलवाहिनी जोडून पाणीपुरवठा करण्यात येईल.
- सौ. मीना साळुंखे,
गटविकास अधिकारी, आटपाडी

‘लोकमत’चे अभिनंदन
विठलापूरमध्ये दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थांना अगदी सळो की पळो करून सोडले. प्रशासनाचे मात्र या पाणीटंचाईकडे दुर्लक्ष झाले. ‘लोकमत’मध्ये याचे वृत्त सोमवार दि. १८ रोजी प्रसिध्द झाल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले. मंगळवारपासून गावाला पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे.

Web Title: Finally, the water question of Vithalpur was over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.