अखेर ‘डोंगरवाडी’चे तीन पंप सुरू!

By Admin | Updated: April 13, 2015 00:01 IST2015-04-12T23:35:16+5:302015-04-13T00:01:28+5:30

प्रतीक्षा संपली : १७ एप्रिलला मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

Finally, three pumps of 'Dongarwadi' started! | अखेर ‘डोंगरवाडी’चे तीन पंप सुरू!

अखेर ‘डोंगरवाडी’चे तीन पंप सुरू!

लिंगनूर : मिरज पूर्व भागात म्हैसाळ योजनेचे आवर्तन सर्व मुख्य कालव्यांवर सुरळीत सुरू झाले आहे, तर आज डोंगरवाडी पंपगृहातील तीन विद्युत पंप सुरू करण्यात आले आहेत. तेथून पुढे खंडेराजुरी तलावाकडे पाणी सोडण्यात येत आहे. डोंगरवाडी पंपगृहातून चाचणीनंतरचे पहिले आवर्तन सुरू झाल्याने या आवर्तनास विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीला, जनरेट्याला व लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाला अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून अखेर आज मूर्त रूप आले. दि. १७ रोजी डोंगरवाडी, भोसे पाणी योजनेच्या उद्घाटनाचा औपचारिक मार्गही यामुळे सुकर झाला आहे.
कालपर्यंत लांडगेवाडी टप्पा क्र. ४ व सलगरे टप्पा क्र. ५ कडे मुख्य कालव्यांतून पाणी सुरू होते, तर आज बेळंकी खिंड रस्त्यावर असणाऱ्या डोंगरवाडी पंपगृहातील तीन विद्युत पंप सुरू क रून येथून पाणी खंडेराजुरी तलावाकडे कालव्यातून सुरू आहे. हा तलाव भरण्यास तीन ते चार दिवस लागतील, असा अंदाज आहे, तर तेथून पुढे भोसे परिसरात पाणी सोडून मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री चंद्रकांत पाटील या मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीत दि. १७ एप्रिल रोजी भोसे येथे उद्घाटन व सभा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार कार्यक्रम व आवर्तनाचेही नियोजन प्रस्तावित करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
आजच लिंगनूर येथील शाखा कालव्यांसह कळंबी, आरग कालव्यातही पाणी सोडण्यात आले आहे. पूर्व भागात एप्रिल महिन्यात एक व मे महिन्यात एक अशी सलग दोन आवर्तने होणार आहेत. त्यानुसार दोन आवर्तनांची आकारणीही होणार आहे. सलग दोन महिने कालवे-उपकालवे यातून मिरज पूर्व भागात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे यंदाचा उन्हाळा सुकर होईल तसेच पुढील किमान दोन महिने भागातील पाणीपातळी पूर्वपदावर आणण्यास चांगली मदत होईल. त्यामुळे जरी जूनमध्ये मान्सून लांबला तरी म्हैसाळची ही दोन आवर्तने शेती व पाणीपातळीकरिता उपयुक्त ठरतील, असा अंदाज आहे. (वार्ताहर)


म्हैसाळचे पहिले आवर्तन मिरज पूर्व भागात सर्वत्र सुरळीत सुरू झाले आहे. प्रभावी पद्धतीने मोजणी करण्याचे काम होईल, पण कालव्यांवर व कालव्यांवरील गेटवर हस्तक्षेप झाल्यास तसेच मोजणीस विरोध करणाऱ्यांस आणि लाभक्षेत्रात असून अर्ज न करणाऱ्यांवर पंचनामे व आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. गरज भासल्यास पोलीस प्रशासनही सहकार्य देणार आहे. तसेच आवर्तन व वितरणातील अनावश्यक हस्तक्षेप करणाऱ्याविरोधात फौजदारी कारवाईही करणार आहे.
- सूर्यकांत नलावडे,
सहायक कार्यकारी अभियंता
.एकरी १५०० रुपयांचे आवर्तन
म्हैसाळ योजनेचे हे सुरू असलेले एक आवर्तन एकरी १५०० प्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे. त्यानुसार दोन आवर्तनांचे एकरी तीन हजार रुपये आकारणी करण्यात येणार आहे. या आकारणीकरिता सर्वाधिक प्रभावी पद्धतीने मोजणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Finally, three pumps of 'Dongarwadi' started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.