अखेर बुधगावची स्वतंत्र मळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:28 IST2021-04-04T04:28:01+5:302021-04-04T04:28:01+5:30
बुधगाव : बुधगावकरांचे स्वच्छ, शुध्द आणि पुरेशा नियमित पाणीपुरवठ्याचे स्वप्न अखेर साकार झाले. राष्ट्रीय पेयजल योजनेतून दोन टप्प्यात त्यासाठी ...

अखेर बुधगावची स्वतंत्र मळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित
बुधगाव : बुधगावकरांचे स्वच्छ, शुध्द आणि पुरेशा नियमित पाणीपुरवठ्याचे स्वप्न अखेर साकार झाले. राष्ट्रीय पेयजल योजनेतून दोन टप्प्यात त्यासाठी ९ कोटी ५१ लाख रुपये खर्च करण्यात आले. ग्रामंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पद्माळे (ता. मिरज) येथील विद्युत पंपांचे बटण दाबून योजना सुरू केली. श्री सिद्धेश्वर नवभारत आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
बुधगाव ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावविहिरीतून पाणीपुरवठा केला जात होता. युती शासनाच्या काळात माधवनगर प्रादेशिक योजना मंजूर झाली. सात गावांचा समावेश असणाऱ्या या प्रादेशिक योजनेतून १५ सप्टेंबर २००२ पासून पाणीपुरवठा होत होता. यामध्ये ब्रम्हनाळ येथून कृष्णा नदीतून पाणी उचलले जात होते. मात्र क्षारपड जमिनीमुळे अल्पावधीतच योजनेच्या जलवाहिन्यांना गळती सुरू झाली. वीज बिल, गळती आणि सात गावांच्या समितीचे घोंगडे यामुळे महिना-महिना योजना बंद असायची. याला वैतागूनच माधवनगर पहिल्यांदा या योजनेतून बाहेर पडले. आता बुधगावचीही स्वतंत्र योजना सुरू झाली आहे. बुधगावात २०१२ साली ग्रामपंचायतीत सत्तेत आलेल्या श्री सिध्देश्वर नवभारत विकास आघाडीने ४ कोटी ४८ लाखाची अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याची तसेच तीन नवीन जलकुंभ उभारणीची योजना मंजूर करुन आणली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५ कोटी ३ लाख खर्चाची योजना स्वतंत्र योजना मंजूर करून आणली. दुसऱ्या टप्प्यात पद्माळेतील उपसागृह ते बुधगावातील शुध्दिकरण केंद्रापर्यंतच्या कामांचा समावेश होता. पद्माळे येथील योजनेच्या उपसागृह व पंपगृहासाठी बुधगावच्याच श्री ज्योतिर्लिंग व श्री दत्त पाणीपुरवठा संस्थेने जागा मोफत दिली आहे. दोन एमएलडी क्षमतेची ही योजना असल्याने दररोज जरी शक्य नसले तरी दिवसाआड पाणीपुरवठा होण्यास अडचण नाही. त्यामुळे बुधगावकरांचा पाण्यासाठीची धावपळ आता संपुष्टात येणार आहे.
पत्रकार बैठकीस सरपंच सुरेश ओंकारे, उपसरपंच सुखदेव गोसावी, तंटामुक्तीचे आनंदराव पाटील, आघाडीचे प्रवीण पाटील, अनिल डुबल, राजेंद्र शिवकाळे आदी उपस्थित होते.
योजनेची वैशिष्ट्ये
१) २०११ च्या जनगणनेनुसार २ एमएलडी क्षमतेची योजना. मात्र भविष्यात ही योजना अपुरी ठरण्याचा धोका.
२) डी.आय.(डस्ट आयर्न) प्रकारच्या जलवाहिन्यांमुळे गळतीच्या त्रासापासून कायमची सुटका.
३) स्वतंत्र योजनेमुळे वीज बिल विलंबाचाही धोका कमी.
चौकट
श्रेयवाद नकाे
या स्वतंत्र योजनेसाठी नवभारत आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्ल्या आहेत. केवळ पत्रकबाजीने एखादा प्रश्न सुटत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे पत्रकबाजीची सवय असलेल्या कोणी उपऱ्यांनी श्रेयासाठी धडपडू नये, असा सल्लाही पत्रकार बैठकीत आघाडी सदस्यांनी दिला.