तासगाव बसस्थानकात फिल्मी स्टाइल राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:50+5:302021-02-09T04:29:50+5:30
शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर तासगावात महाविद्यालयीन तरुण-तरुणींची संख्या वाढत आहे. किरकोळ कारणांवरून खुन्नस देणे, दमबाजी व मारहाणीचे प्रकार सध्या ...

तासगाव बसस्थानकात फिल्मी स्टाइल राडा
शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर तासगावात महाविद्यालयीन तरुण-तरुणींची संख्या वाढत आहे. किरकोळ कारणांवरून खुन्नस देणे, दमबाजी व मारहाणीचे प्रकार सध्या वाढत आहेत. सोमवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान बसस्थानक आवारात १५ जणांच्या टोळक्याशी एक तरुणाचा वाद सुरू होता. वाद वाढत जाऊन बाचाबाची सुरू झाली.
यातील काही तरुणांनी शिवीगाळ करत त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. तर, काही तरुणांनी या तरुणास खाली पाडत लाथा व पट्ट्याने फिल्मी स्टाइल मारहाण करण्यास सुरुवात केली. माराने खाली पडलेला तरुण जीवाच्या आकांताने ओरडत होता. त्याच्या आवाजाने प्रवाशांसह बसस्थानकावरील मंडळींनी मदतीसाठी धाव घेतली. जमावास पाहून संबंधित टोळक्याने धूम ठोकली.
या प्रकारात जखमी तरुण लंगडत मित्राच्या साहाय्याने उपचारासाठी निघून गेला. अचानक झालेल्या या प्रकाराने बसस्थानकात काही काळ तणावाचे वातावरण होते. गेले काही दिवस तरुणांच्यात मारामारीच्या घटना वाढत आहेत. मणेराजुरीत नुकताच झालेला खून हा फिल्मी स्टाइलने झाला होता. हे गंभीरतेने घेण्याची गरज आहे. बसस्थानकात कायमस्वरूपी पोलीस नसल्याने या प्रकारात वाढ होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित तरुणांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
फाेटाे : ०८ तासगाव १