‘वसंतदादा’च्या आर्थिक संकटात भर
By Admin | Updated: December 26, 2014 23:48 IST2014-12-26T22:54:01+5:302014-12-26T23:48:02+5:30
जागा विक्रीच्या १०९ निविदा अपात्र : शासनाच्या अभिप्रायानंतरच निर्णय

‘वसंतदादा’च्या आर्थिक संकटात भर
सांगली : येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या २१ एकर जागेवरील १०३ प्लॉटच्या खरेदीसाठी १२३ निविदा दाखल झाल्या होत्या. मात्र त्यातील १०९ निविदाधारकांनी नियमानुसार बयाणा रकमेचे डी.डी. देण्याऐवजी धनादेश दिल्याने नियमांचा भंग झाला असून, त्या निविदा अपात्र ठरल्या आहेत. या सर्व गोंधळामुळे जागा विक्रीची प्रक्रिया पुन्हा अडचणीची ठरत असून, कारखान्यासमोरील आर्थिक संकटात भर पडली आहे. दरम्यान, चौदा निविदाधारकांना जागेची विक्री करायची का, यावर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाकडे अभिप्राय मागविला असल्याचे जागा विक्री समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी सांगितले.
उसाची बिले भागविण्यासाठी साखर आयुक्तांच्या आदेशाने मिरज तहसीलदारांनी कारखान्याला मालमत्ता जप्तीची नोटीस बजाविली होती. शेतकऱ्यांच्या देण्यांसोबतच जिल्हा बँकेचे ७८ कोटींचे कर्ज कारखान्यावर आहे. परिणामी बँका व शेतकऱ्यांची थकित देणी देण्यासाठी संचालक मंडळाने कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.
कारखान्याच्या उत्तर बाजूला सांगली-माधवनगर रस्त्यालगतच ही जागा आहे. त्यामुळे या जागेला चांगली किंमत मिळून कारखान्याची देणी भागतील, असा तर्क काढण्यात आला होता. त्यानुसार जागा विक्रीचा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे देण्यात आला होता. या २१ एकर जागेत १०३ प्लॉट पाडण्यात आले आहेत. जागा विक्रीतून येणारी ५० टक्के रक्कम जिल्हा बँकेला थकित कर्जाच्या वसुलीपोटी, तर उर्वरित ५० टक्के रक्कम कारखान्यास मिळणार आहे. कारखाना या रकमेतून ऊस उत्पादकांची थकित रक्कम आणि कामगारांची देणी देणार होता. १०३ प्लॉटसाठी १२३ निविदा दाखल झाल्या आहेत. त्यापैकी १४ निविदाधारकांनी नियमाप्रमाणे निविदा दाखल केल्या असून उर्वरित १०९ जणांनी निविदेसोबत डी.डी.ऐवजी धनादेश जोडल्यामुळे त्यांची निविदा अपात्र ठरल्याचे कोतमिरे यांनी सांगितले. याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. (प्रतिनिधी)