एलबीटी भरा, अन्यथा कारवाईला सामोरे जा
By Admin | Updated: December 2, 2014 00:13 IST2014-12-01T23:35:40+5:302014-12-02T00:13:40+5:30
अजिज कारचे : व्यापाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

एलबीटी भरा, अन्यथा कारवाईला सामोरे जा
सांगली : व्यापाऱ्यांना सहकार्याची भूमिका म्हणून आजवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आता नागरिकांच्या व शहराच्या हितासाठी एलबीटी भरावा, अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, २२ मे २0१३ पासून महापालिका क्षेत्रात हा कर लागू झाला आहे. स्थानिक संस्था कराबाबत विविध ३८ व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी अनेकवेळा बैठका झाल्या आहेत. आतापर्यंत एकूण ९ हजार ९५६ व्यापाऱ्यांनी नोंदणी केली असून महापालिका क्षेत्रातील २ हजारावर व्यापारी नियमितपणे कराचा भरणा करीत आहेत. लोकप्रतिनिधी व व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या विनंतीवरून महापालिकेने आजवर कठोर कारवाई टाळली आहे. शहरातील मोठ्या मॉल व्यवस्थापनाकडूनही नियमित कर भरला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनीही कर भरण्याबाबत केलेल्या आवाहनास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा आम्ही कर भरण्याबाबत आवाहन करीत आहोत. ज्यांनी अद्याप एलबीटी कराची नोंदणी केली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करावी व कराचा भरणा करावा. ज्यांनी कराचा भरणा केला नाही, त्यांनी तो करावा. नियमानुसार कराचा भरणा होत असेल तर महापालिकेकडून अशा व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची आम्ही खात्री देतो.
आवाहनास प्रतिसाद न देता जे व्यापारी नोंदणी करणार नाहीत व कराचा भरणा करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आयुक्तांच्या या इशाऱ्यामुळे आता पुन्हा व्यापारी व प्रशासनात संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. (प्रतिनिधी)