जतमध्ये खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST2021-02-24T04:27:59+5:302021-02-24T04:27:59+5:30

जत : पंचाहत्तर हजार रुपयांचे मुद्दल व व्याज मिळून एक लाख ४६ हजार रुपये परत करूनही, आणखी दोन ...

Filed a case against a private lender in Jat | जतमध्ये खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल

जतमध्ये खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल

जत : पंचाहत्तर हजार रुपयांचे मुद्दल व व्याज मिळून एक लाख ४६ हजार रुपये परत करूनही, आणखी दोन लाख पन्नास हजार रुपये राहिले आहेत, म्हणून वेळोवेळी तगादा लावून, घर नावावर कर म्हणून त्रास दिल्याच्या आरोपावरून खासगी सावकार मच्छिंद्र ऊर्फ बाळू कांबळे-जतकर (वय ३०, रा. विठ्ठलनगर, जत) याच्याविरोधात व्यंकाप्पा शंकर नाटेकर (वय ६६, रा. वळसंग, ता. जत) यांनी जत पोलिसात सोमवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

अधिक माहिती अशी की, व्यंकाप्पा यांचा मुलगा सिद्धाप्पा नाटेकर याने हॉटेल व्यवसायासाठी मच्छिंद्र कांबळे यांच्याकडून ऑक्टोबर २०१८ मध्ये व्याजाने ७५ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर रोख स्वरूपात व गूगल पे आणि फोन पेवरून त्याला वेळोवेळी एक लाख ४६ हजार रुपये परत केले होते. तरीही आणखी दोन लाख ५० हजार रुपये राहिले आहेत, म्हणून व्यंकाप्पा, त्यांची मुले दुंडाप्पा व सिद्धाप्पा आणि कल्लाप्पा त्यांना फोनवरून व प्रत्यक्ष भेटून राहिलेले पैसे द्या, अन्यथा तुमचे घर माझ्यावर नावावर करा, अन्यथा तुम्हाला माझ्या मळ्यात चाकरीला ठेवतो, असे म्हणून शिवीगाळ करून धमकी देत होते.

वेळोवेळी होणाऱ्या त्रासाला व धमकीला कंटाळून व्यंकाप्पा याने मच्छिंद्र कांबळे यांच्याविरोधात जत पोलिसात सोमवारी रात्री फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपडेकर करत आहेत.

चौकट

जत शहर व परिसरात खासगी सावकारीच्या व्यवसायातून खासगी सावकार जर कोणाला त्रास देत असतील, तर त्यांनी जत पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे व फिर्यादीचे नाव गोपनीय ठेवून तपास करून संबंधित खासगी सावकारांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक उत्तम जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी केले आहे.

Web Title: Filed a case against a private lender in Jat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.