कर्नाळमध्ये मारामारी; एकावर विळ्याने हल्ला
By Admin | Updated: July 18, 2016 00:38 IST2016-07-18T00:38:29+5:302016-07-18T00:38:29+5:30
गंभीर जखमी : सहाजणांविरुद्ध गुन्हा

कर्नाळमध्ये मारामारी; एकावर विळ्याने हल्ला
सांगली : आईला शिवीगाळ केल्याचा जाब एकाने विचारल्याच्या कारणावरून कर्नाळ (ता. मिरज) येथे दोन गटांत मारामारी झाली. गणेश लक्ष्मण नरळे (वय ३२) या तरुणावर विळ्याने हल्ला करण्यात आला. शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तातोबा नरळे, बाळू हिप्परकर, सुनीता तातोबा नरळे, शांताबाई करांडे, लता शिंदे, मंगल बाळू नरळे (सर्व रा. कर्नाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तातोबा नरळे याने शनिवारी रात्री दारूच्या नशेत गणेश नरळे यांच्या आईस शिवीगाळ केली होती. हा प्रकार समजताच गणेशने तातोबाला जाब विचारला. यातून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. तक्रारीनुसार संशयितांनी बेकायदा जमाव जमवून गणेशला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बाळू हिप्परकर याने त्याच्यावर विळ्याने हल्ला केला. यामध्ये गणेश गंभीर जखमी होताच संशयितांनी तेथून पलायन केले. रात्री उशिरा गणेशला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी गणेशचा जबाब घेऊन संशयितांविरुद्ध मारामारीचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)