महापालिकेतील दोन ठेकेदारांची हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:28 IST2021-08-15T04:28:01+5:302021-08-15T04:28:01+5:30
सांगली : महापालिकेच्या परफॉर्मन्स डिपॉजिटवरून दोन ठेकेदारांनी सांगलीतील एका हॉटेलमध्ये जोरदार हाणामारी केली. हाॅटेलमधील मिळेल त्या वस्तू मारुन त्यांनी ...

महापालिकेतील दोन ठेकेदारांची हाणामारी
सांगली : महापालिकेच्या परफॉर्मन्स डिपॉजिटवरून दोन ठेकेदारांनी सांगलीतील एका हॉटेलमध्ये जोरदार हाणामारी केली. हाॅटेलमधील मिळेल त्या वस्तू मारुन त्यांनी एकमेकांना लोळवले. महापालिका मक्तेदार संघटनेचे पदाधिकारी व अन्य मक्तेदार यांच्यासमोर भरदिवसा हा प्रकार घडला.
काँग्रेस भवनासमोरील हॉटेलमध्ये मक्तेदार संघटनेने पत्रकार परिषद आयोजित केली होती. याचवेळी फरफॉमन्स डिपॉझिटचा विषय मांडला जात असताना त्यावरून दोन ठेकेदारांमध्ये मतभेद झाले. आयुक्त कापडणीस यांनी मक्तेदारांना काम दिले होते. केंद्राची टीम पहाणी करण्यासाठी शहरात येणार असल्याने ठेकेदारांना आधी काम करा, नंतर पाहू, अशा सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. प्रत्यक्षात जेव्हा या कामाची बिले मंजुरीसाठी गेली तेव्हा शहर अभियंत्यांनी परफॉर्मन्स डिपॉझिट भरलेले नसल्याने बिल पुढे पाठवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. हा विषयही चर्चेला घ्या, असा आग्रह एका मक्तेदाराने धरला. दुसऱ्या मक्तेदाराने हा विषय आयुक्तांना जावून सांगा, असे सुनावले. यावरून सुरुवातीला अरे-तुरेचा वाद नंतर हातघाईवर आला. एकमेकाची कॉलर धरून टेबलावरील भांडे, चमचे, ग्लास व अन्य साहित्य फेकून मारण्याचा प्रकार घडला.
जेवायला आलेले काही कुटुंबेही या हाणामारीने घाबरली. काही मक्तेदारांनी ही भांडणे सोडवायचा प्रयत्न केला. तोपर्यंत दोघा मक्तेदारांनी आपापल्या कार्यकर्त्यांना पुढच्या तयारीसाठी फोन करून बोलवून घेण्याचा प्रयत्न केला. यात सांगलीवाडीचे कार्यकर्ते धावून आले. दुसरे मिरजेचे कार्यकर्ते आले; मात्र थोड्या वेळात नेत्यांचे फोन झाले आणि भांडणही मिटले.