आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करणार

By Admin | Updated: October 5, 2015 00:06 IST2015-10-04T22:31:37+5:302015-10-05T00:06:10+5:30

जे. पी. धनगर : सांगलीत धनगर समाज मेळावा; हिवाळी अधिवेशनापर्यंत अल्टीमेटम

The fight for the reservation will further intensify | आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करणार

आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करणार

सांगली : केंद्रात व राज्यात भाजपचे शासन येऊन वर्षभराचा कालावधि लोटला तरी, शासनाकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या निर्णयाकडे दुर्लक्ष होत असून, येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी समाजाला आरक्षण न मिळाल्यास आरक्षणाचा लढा तीव्र करणार असल्याचा इशारा धनगर समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. धनगर यांनी दिला. दरम्यान, येत्या ७ डिसेंबरपासून नागपूर येथून आंदोलनास सुरूवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगलीत रविवारी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. धनगर म्हणाले, सत्तेवर येताच पंधरा दिवसात आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दिले होते. मात्र, आता भाजपचे शासन केंद्रात येऊन दीड वर्ष, तर राज्यातील शासनास एक वर्ष पूर्ण झाले, तरीही शासनाकडून अजूनही आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. भाजप सरकार सत्तेवर येण्यामध्ये धनगर समाजाने मोठी भूमिका बजावली होती. मात्र, या समाजाच्या प्रश्नाकडे शासनाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे. समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष होत असले तरी, शासनाला डिसेंबरपर्यंतची मुदत आम्ही देत आहोत. त्यापूर्वी आरक्षण घोषित न झाल्यास नागपूर येथून आम्ही तीव्र आंदोलनास सुरूवात करणार आहे. हा लढा पूर्णपणे राजकारणविरहित असणार आहे. शासनाकडून आरक्षणाचा निर्णय न झाल्यास राज्यभर उपोषण, धरणे आंदोलन करून आरक्षणाचा लढा तीव्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
निवृत्त आय.पी.एस. अधिकारी मधुकर शिंदे म्हणाले, महाराणी अहिल्यादेवी होळकर समाजप्रबोधन मंचच्यावतीने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू असून शासनाला ३०० पानांचे निवेदन सादर केले आहे. यात धनगड ही जातच अस्तित्वात नसल्याबाबतचे पुरावे सादर केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाच अहवाल सादर केले असून, शासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
यावेळी डॉ. जे. पी. बघेल, एम. ए. पाचपोल, गोपीचंद पडळकर, प्रकाशअण्णा शेंडगे, प्रा. विष्णू कावळे, नगरसेवक विष्णू माने, डॉ. विकास महात्मे, दादासाहेब दुधाळ, भारत दुधाळ यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)


राजकारणविरहीत लढाई
सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाने केवळ धनगर समाजाच्या मतपेटीवर लक्ष ठेवून आरक्षणाचे आश्वासन दिले; मात्र प्रत्यक्षात आरक्षण देण्यास टाळाटाळ केली आहे. तर समाजातील काहींनी समाजाच्या एकजुटीचा फायदा घेत राजकारण केले, त्यामुळे आता धनगर समाज सजग झाला असून, यापुढे आरक्षणाचा लढा राजकारणविरहीत ठेवणार असल्याचे वक्त्यांनी यावेळी सांगितले. यामुळेच देशपातळीवर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या जे. पी. धनगर यांना मेळाव्यासाठी आमंत्रित केल्याचे सांगत भाजप शासनाने धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास यापुढे कोणत्याही निवडणुकीत समाज भाजपच्या पाठीशी उभा राहणार संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: The fight for the reservation will further intensify

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.