भोसे येथे कॉँग्रेस-भाजप समर्थकांत मारामारी
By Admin | Updated: April 25, 2015 00:12 IST2015-04-25T00:08:41+5:302015-04-25T00:12:33+5:30
चाकू, लोखंडी गज, चटणीचा वापर : दोन्ही गटाच्या ७५ जणांविरूध्द गुन्हा, ६२ जणांना अटक

भोसे येथे कॉँग्रेस-भाजप समर्थकांत मारामारी
मिरज : तालुक्यातील भोसे येथे गुरुवारी रात्री पूर्ववैमनस्य व राजकीय संघर्षातून काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गटात चाकू, लोखंडी गज व चटणीचा वापर करून झालेल्या हाणामारीत चौघे जखमी झाले. मारामारीप्रकरणी दोन्ही गटाच्या ७५ जणांविरूध्द गुन्हा दाखल
करून ६२ जणांना अटक करण्यात आली.
भोसेत जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार माजी सरपंच प्रकाश मलमे यांच्या पराभवानंतर मलमे व भाजपचे मनोज पाटील या दोन गटात वारंवार संघर्ष सुरू आहे. गावातील चौकाला नाव देण्यावरून गतवर्षी दोन गटात वाद झाला होता. गणेशोत्सवादरम्यान परस्परांच्या अंगावर चिरमुरे उधळल्याच्या कारणावरून मारामारी झाली होती.
चार दिवसांपूर्वी शिवजयंतीनिमित्त काँग्रेस समर्थकांनी डिजिटल फलक लावून भाजप कार्यकर्त्यांना आव्हान दिले होते. शिवजयंतीस भाजपसमर्थक वैभव गणेशवाडे यास विनायक कोळी व साथीदारांनी मारहाण केली. गणेशवाडे यास मारहाणीमुळे संतप्त झालेल्या भाजप समर्थकांनी गुरूवारी रात्री विनायक कोळी याची दुचाकी काढून घेऊन मुख्य चौकात लावली. यावेळी विनायक कोळी व समर्थकांच्या जमावाने ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत दगडफेक करीत दुसऱ्या गटावर हल्ला चढवला. आकाश राजगोंडा पाटील, कोमल पाटील, अभिजित चौगुले यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. हल्लेखोरांनी आणलेला चाकू, लोखंडी गज व चटणी हिसकावून घेऊन दुसऱ्या गटानेही त्यांना प्रत्युत्तर दिले. चाकूने वार करणाऱ्या एका लहान मुलास भाजप समर्थकांनी बेदम मारहाण केली.
गावातील मुख्य चौकात झालेल्या दोन गटातील हाणामारीमुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. याबाबतची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पिटाळले. मारामारीप्रकरणी वैभव विजयकुमार गणेशवाडे याने माजी सरपंच प्रकाश मलमे, भरत कवठेकर यांच्यासह ४६ जणांविरूध्द पोलिसात फिर्याद दिली आहे. दत्तात्रय झांबरे याने आकाश पाटील, वैभव गणेशवाडे यांच्यासह २८ जणांविरूध्द मारहाणीची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या ७५ जणांविरूध्द गुन्हा दाखल करून भाजप समर्थक आकाश राजगोंडा पाटील (वय २३), वैभव विजय गणेशवाडे (२१), अभिजित विजय चौगुले (२१) दीपक तात्यासाहेब पाटील (२७) यांच्यासह काँगे्रस समर्थक विनायक मनोहर कोळी (२०), किरण मनोहर कोळी (२३), सूरज दिलीप कोळी (२१), अविनाश नारायण ऊर्फ प्रकाश कदम (५५, सर्व रा. भोसे) आदी ६२ जणांना अटक केली.
दोन लहान मुलांसह जिनेश्वर नंदकुमार चौगुले, माजी सरपंच प्रकाश शामराव मलमे, दीपक मारूती कांबळे, विकास मलमे, बालाजी मलमे, आनंद विठ्ठल शिंदे, बंडू झेंडू मलमे, तुळशीराम जाधव, मनोहर रामचंद्र कोळी, प्रशांत शंकर तासवडे, सुहास श्रीरंग जगदाळे आदी १३ जणांना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)