पाचवी ते आठवीचे पावणेदोन लाख विद्यार्थी करणार शिक्षणाचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:05+5:302021-01-19T04:28:05+5:30
कोरोनामुळे नववी ते बारावीचेच वर्ग सुरू होते. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू होतील. लोकमत न्यूज नेटवर्क ...

पाचवी ते आठवीचे पावणेदोन लाख विद्यार्थी करणार शिक्षणाचा श्रीगणेशा
कोरोनामुळे नववी ते बारावीचेच वर्ग सुरू होते. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू होतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पाचवी ते दहावीचे वर्ग तब्बल १० महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. शिक्षणासाठी पालक, विद्यार्थी व शिक्षक सारेच उत्सुक आहेत, पण त्यांना अनेक अडचणींनाही तोंड द्यावे लागणार आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दररोजची सरासरी संख्या २० आहे, तर एकूण रुग्ण ४० ते ५० आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाची भीती नाही. अन्य अडचणी मात्र खूपच आहेत. शहरासाठी ग्रामीण भागातून बसेस पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने विद्यार्थी शाळेत कसे येणार, हा प्रश्न आहे. ग्रामीण भागांतर्गतही पुरेशा बसेस सुरू झालेल्या नाहीत. कोरोनाचे लसीकरण सर्वसामान्यांसाठी सुरू नसल्यानेही पालकांत धाकधूक कायम आहे. त्यामुळे वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती कितपत राहणार याविषयी उत्सुकता असेल.
अनेक शाळांत कोरोनाची विलगीकरण केंद्रे सुरू केली होती. त्यांचे निर्जंतुकीकरण शाळांनाच करून घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतींनी त्यासाठी वित्त आयोगातून पैसे देण्याची सूचना असली, तरी तिचे पालन झालेले नाही. या स्थितीत वर्गांची काळजीपूर्वक सफाई करावी लागत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. सध्या नववी ते बारावीचे वर्ग सुरू असले, तरी उपस्थिती ५०-६० टक्क्यांपर्यंतच आहे. त्यामुळेही पाचवी ते आठवीच्या उपस्थितीविषयी उत्सुकता आहे. यंदा जवळपास संपूर्ण वर्ष विद्यार्थ्यांनी घरातच काढल्याने उर्वरित महिन्यांसाठी गॅप घेण्याची पालकांची मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळेही १०० टक्के विद्यार्थी वर्गात येण्याची शक्यता नाही. त्यांचा भर ऑनलाइन शिक्षणावरच राहील.
चौकट
नववी ते बारावीला ६० टक्केच उपस्थिती
नववी ते बारावीचे वर्ग सध्या सुरू असले, तरी उपस्थिती ५० ते ६० टक्केच आहे. बसेस बंद असणे, शहरातील खासगी वसतिगृहे अद्याप सुरू नसणे, अशा कारणांनी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यात अडचणी येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी यावर्षी गॅपही घेतला आहे. त्यामुळे सरासरी ६० टक्क्यांपर्यंत उपस्थिती दिसून येत आहे.
चौकट
जिल्ह्यातील विद्यार्थीसंख्या
पाचवी - ४४३८०, सहावी - ४३४९५, सातवी - ४३५४८, आठवी - ४४०७६
जिल्ह्यातील शाळांची संख्या - १५८०
पाचवी ते आठवीची शिक्षकसंख्या - ९६७४
कोट
शहरात अजूनही एखाद-दुसरा कोरोनाबाधित सापडत असल्याचे काहीशी चिंता आहे. वर्गात विद्यार्थी सोशल डिस्टन्स किंवा मास्क अशी काळजी घेणार नाहीत, हेदेखील स्पष्ट आहे. त्यामुळे मुलाला शाळेत पाठविण्याविषयी अद्याप निर्णय घेतलेला नाही.
- अविनाश शेटे, पालक
कोट
आठ-नऊ महिने मुलगा घरातच राहिल्याने यंदाचे वर्ष गॅप घेण्याचा विचार आहे. दोन-तीन महिन्यांत शाळा आणि परीक्षा आटोपली जाणार असल्याने ख-या अर्थाने अभ्यास होणारच नाही. तरीही, तो प्रवाहात राहावा यासाठी शाळेत पाठवणार आहे.
- संजय कोळसे, पालक
कोट
मुलीला हजेरीपुरती शाळेत पाठविणार आहे. गेले वर्षभर ऑनलाइनवर पूर्ण अवलंबून न राहता घरात आम्हीही अभ्यास घेतला. आता राहिलेला अभ्यास व परीक्षेसाठी शाळेत पाठवावे लागेल. शाळांचे पूर्ण निर्जंतुकीकरण व स्वच्छतेसाठी प्रशासनाने काळजी घेण्याची अपेक्षा आहे.
रोहिणी जाधव, पालक
कोट
कोरोनाची पूर्ण काळजी घेऊन ५० टक्के उपस्थितीवर वर्ग सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार, सर्व शाळांना कळविले आहे. ग्रामीण भागातून चांगल्या उपस्थितीची अपेक्षा आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहिल्याने अधिक चांगले शिक्षण होऊ शकेल.
- नामदेव माळी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
-----------
----------