पन्नास हजारावर मराठा बांधव सहभागी होणार

By Admin | Updated: September 13, 2016 00:50 IST2016-09-13T00:01:55+5:302016-09-13T00:50:31+5:30

कवठेमहांकाळ येथील बैठकीत निर्णय : २७ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा

Fifty thousand people will participate in the Maratha band | पन्नास हजारावर मराठा बांधव सहभागी होणार

पन्नास हजारावर मराठा बांधव सहभागी होणार

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथील सिद्धनाथ मल्टिपर्पज हॉलमध्ये २७ सप्टेंबरच्या मराठा क्रांती मोर्चाच्या मोर्चेबांधणीसाठी मराठा समाजबांधवांची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीत कवठेमहांकाळ तालुक्यातून ५० हजारांवर मराठा बांधव जाण्याचा निर्धार करण्यात आला आहे. २७ सप्टेंबरचा मोर्चा यशस्वी करण्याचाही निर्धार करण्यात आला. या बैठकीला २ हजारावर मराठा समाजबांधव जमले होते.
कोपर्डी (जि. अहमदनगर) येथील घटनेचे संपूर्ण राज्यभर मराठा समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातही मराठा क्रांती मोर्चा २७ सप्टेंबरला निघणार आहे. या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ तालुका मराठा समाजबांधवांची बैठक येथे पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.
सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून बैठकीला सुरुवात झाली. प्रत्येक गावातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त करून, गावातील मराठा समाजाच्या घरा-घरातून किमान एक तरी मराठा समाजबांधव मराठा क्रांती मोर्चासाठी आणण्याचा निर्धार करण्यात आला. या मराठा क्रांती मोर्चासाठी जास्तीत जास्त महिला वर्ग कसा येईल, याकडेही लक्ष दिले जाणार आहे. पक्ष, संघटना बाजूला ठेवून ‘एक दिवस आपल्या समाजासाठी, एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले व तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने मराठा समाज कसा क्रांती मोर्चासाठी सांगलीला येईल, याचे नियोजन करण्यात आले.
प्रत्येक मराठा समाजबांधवाने व तरुणांनी २७ सप्टेंबरचा मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मराठा आरक्षण, शैक्षणिक सुविधा आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी डॉ. संजय पाटील यांनी, मराठा बांधवांनी मोर्चामध्ये आचारसंहितेचे पालन करायचे आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचीही काळजी घेण्याची आहे. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ हा मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.
आर. एस. पवार, महादेव साळुंखे, महेश खराडे, प्रणिता पवार, भारत डुबुले, रमेश भोसले, वैशाली पाटील, अनिल शिंदे यांच्यासह अनेक मराठा बांधवांनी बैठकीत मनोगत व्यक्त केले. मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही मान्यवरांनी केले.
या बैठकीसाठी जिल्हा बॅँकेचे संचालक सुरेश पाटील, जि. प. माजी सभापती दत्तात्रय पाटील, भानुदास पाटील, आप्पासाहेब शिंदे, जनार्दन पाटील, सम्राट भोसले, नारायण पवार, एम. के. पाटील, युवराज जगदाळे, शिवसेनेचे अनिल पाटील, किशोर पाटील, शिवाजी बोराडे, बाळासाहेब पाटील, रणजित घाडगे, विशाल शिंदे, तुकाराम पाटील, ऋतुराज पवार, दिलीप पाटील, उषा पाटील, अविराजे शिंदे, शोभा पवार आदींसह मराठा समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)

व्यापार बंद ठेवावा
मराठा क्रांती मोर्चाच्या दिवशी तालुक्यातील मराठा बांधवांनी, मराठा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत, तसेच शाळा, महाविद्यालये यांनाही सुटी देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले.
मराठा बांधवांनी मोर्चामध्ये आचारसंहितेचे पालन करायचे आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचीही काळजी घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

Web Title: Fifty thousand people will participate in the Maratha band