इस्लामपुरातील रस्त्यावर शंभर फुटात पन्नास खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:32 IST2021-09-10T04:32:27+5:302021-09-10T04:32:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील बहे रस्त्यावरील वाळवा बाजार समोरील रस्त्याची अवस्था म्हणजे ‘शंभर फुटात पन्नास खड्डे’ अशी ...

इस्लामपुरातील रस्त्यावर शंभर फुटात पन्नास खड्डे
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील बहे रस्त्यावरील वाळवा बाजार समोरील रस्त्याची अवस्था म्हणजे ‘शंभर फुटात पन्नास खड्डे’ अशी झाली आहे. त्यातच फळे, भाजीपाला विक्रेते, हातगाडे रस्त्याच्या दुतर्फा थांबतात. जड वाहनेही याच रस्त्यावरून जातात. त्यामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. याकडे नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष आहे. येथील वाहतूक पोलीस गांधारीच्या भूमिकेत दिसतात.
शिवाजी पुतळा ते जुना बहे नाका पर्यंतच्या रस्त्यातील ‘खड्डे मोजा आणि बक्षीस मिळवा’ अशा स्पर्धेचे आयोजन करण्याची वेळ नगरपालिका प्रशासनावर आली आहे. नेहमी तात्पुरती डागडुजी केल्यानंतर पावसात पुन्हा खड्डे पडतात. त्यातच फळे आणि भाजीपाला विक्रेते रस्त्यावरच बसलेले असतात. ग्राहक चारचाकी, दुचाकी रस्त्यातच उभी करतात. शिवाय मार्केट यार्ड आणि औद्योगिक वसाहतीकडे जाणारी जड वाहने येथूनच जातात. शिवाजी पुतळा आणि बहे नाका येथे बॅरिकेट्स लावलेले असतात. बहुतांश वेळा तेथे वाहतूक पोलीस नसतात. त्यामुळे ग्राहक वाहने रस्त्यावर लावून भाजीपाला खरेदी करतात. या रस्त्यावरील वाळवा, अजिंक्य, वारणा बझार येथे ग्राहकांची गर्दी असते. त्यामुळे कोंडी आणि अपघाताला निमंत्रण ठरलेले आहे.
जयंतरावांच्या नजरेत हे नसेल का?
याच रस्त्यावर राष्ट्रवादीच्या वाळवा तालुक्याचे कार्यालय आहे. या कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्ते यांची वर्दळ असते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील या कार्यालयात बैठकीसाठी येतात. ही त्रासदायक कोंडी आणि खड्डेमय रस्ते त्यांच्या नजरेत येत नसतील का, असा सवाल विचारला जात आहे.