कडेगाव तालुक्यात चिंचणी डोंगराला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:37+5:302021-03-04T04:51:37+5:30
देवराष्ट्रे : कडेगाव तालुक्यातील वन विभागाच्या चिंचणी-तडसर हद्दीतील डोंगराला बुधवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. यामध्ये वन विभागाचे अंदाजे ...

कडेगाव तालुक्यात चिंचणी डोंगराला भीषण आग
देवराष्ट्रे :
कडेगाव तालुक्यातील वन विभागाच्या चिंचणी-तडसर हद्दीतील डोंगराला बुधवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. यामध्ये वन विभागाचे अंदाजे २५० एकर क्षेत्र जळून खाक झाले, तसेच डोंगर पायथ्याच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत आग विझविण्यात अडचणी येत होत्या.
बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या पश्चिम बाजूने या डोंगराला आग लागली.
डोंगरावर वाळलेले गवत मोठ्या प्रमाणात असल्याने व उन्हाची तीव्रता वाढल्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरली.
चिंचणी येथून सुरू झालेली आग सोनकिरे, शिरसगावच्या बाजूला असलेल्या हत्तीवाला डोंगराकडे सरकत गेली. या आगीत अनेक झाडेझुडपे व वनसंपदा जळून खाक झाली. ही आग एवढी भीषण होती की रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती.
या वन क्षेत्राच्या आजूबाजूला असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाची शेती आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस शेतात उभा आहे. ही आग उसाच्या शेतात शिरल्याने काही शेतकऱ्यांच्या उसाचे तर फळझाडांच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे.
चाैकट
जागतिक वन दिनादिवशीच आग
बुधवारी देशभरात जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला. याच दिवशी वन विभागाच्या क्षेत्राला आग लागल्याने व या आगीत वन्यजीवांचे मोठे नुकसान झाल्याने वन्यजीवप्रेमींतून हळहळ व्यक्त करण्यात येत होती.