वाळवा-शिराळ्यामधील मातब्बर नेत्यांची फिल्डिंग
By Admin | Updated: April 20, 2015 00:03 IST2015-04-19T23:31:06+5:302015-04-20T00:03:40+5:30
जिल्हा बँक निवडणूक : जयंतरावांना दहा जागांची अपेक्षा

वाळवा-शिराळ्यामधील मातब्बर नेत्यांची फिल्डिंग
अशोक पाटील- इस्लामपूर -सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. बँकेवर संचालक म्हणून जाण्यासाठी वाळवा, शिराळा तालुक्यातील मातब्बर नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. या बँकेवर वर्णी लागावी म्हणून आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांत रस्सीखेच सुरू आहे. वाळवा व शिराळ्यातील मतदारांची संख्या पाहता, जयंत पाटील यांना १० जागांची अपेक्षा आहे. परंतु त्यांच्या पदरात ६ जागा पडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जिल्ह्यात एकूण २,२0७ मतदान आहे. पैकी वाळवा-शिराळ्यात ६९३ इतके मतदान आहे. याचाच अर्थ संपूर्ण जिल्हा एका बाजूला आणि वाळवा-शिराळा तालुका एका बाजूला, अशी स्थिती आहे. यामुळे जयंत पाटील यांच्या समर्थकांनी २१ पैकी १० जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतु त्यांच्या पदरात वाळव्यासाठी ४ व शिराळ्यासाठी २ जागा निश्चित पडतील, अशी चर्चा आहे. या दोन्ही तालुक्यातून जवळ-जवळ ३० जणांनी आपले अर्ज दाखल केले असून, निवडणूक बिनविरोध झाल्यास यातील संचालक निश्चित करताना जयंतरावांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आहेत. आमदार शिवाजीराव नाईक हे भाजपचे आमदार आहेत. परंतु त्यांची संस्थात्मक ताकद तोकडी आहे. जयंतरावांचे खास समर्थक दिलीपराव पाटील यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. कोणत्याही परिस्थितीत बँकेच्या अध्यक्षपदावर जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे.
सहकारी क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले व शिवाजीराव नाईक यांचे पूर्वाश्रमीचे कट्टर समर्थक डॉ. प्रताप पाटील हे आता जयंत पाटील यांच्या गटात असल्याने त्यांनाही संधी मिळेल. विलासराव शिंदे हेही इच्छुक असले तरी, ते सध्या तरी अपात्र यादीत असल्याने त्यांच्या गटातून कणेगावचे अॅड. विश्वासराव पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
शिराळा तालुक्यात मानसिंगराव नाईक यांच्या संस्था सक्षम आहेत. सभासद मतदानही त्यांच्या बाजूने चांगले आहे. त्यामुळे ते स्वत: जिल्हा बँकेसाठी इच्छुक आहेत. वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीची ताकद आहे. त्याखालोखाल काँग्रेस आणि भाजपची आहे. या निवडणुकीत पक्षीय पातळीवर शिवाजीराव नाईक यांचा विचार झाल्यास, त्यांच्या पदरातही एखादी जागा जाण्याची शक्यता आहे.