बांधकामे अधिकृतसाठी दलालांची ‘फिल्डिंग’

By Admin | Updated: June 15, 2014 00:22 IST2014-06-15T00:18:43+5:302014-06-15T00:22:10+5:30

विट्यात खळबळ : एक ते तीन लाखांपर्यंतची दलाली; आठजणांवर गुन्हे

'Fielding' of brokers for official construction | बांधकामे अधिकृतसाठी दलालांची ‘फिल्डिंग’

बांधकामे अधिकृतसाठी दलालांची ‘फिल्डिंग’

दिलीप मोहिते ल्ल विटा
विटा नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत आठ जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल करून पाठीवर विटेकर नागरिकांची कौतुकाची थाप घेत असतानाच आता अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी दलालांनी ‘फिल्डिंग’ लावल्याची चर्चा जोरात सुरू असल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या दलालांनी पोलिसांत गुन्हे दाखल झाल्यानंतर ‘जात्यात व काही सुपात’ असलेल्या अनधिकृत बांधकाम मालकांचा पाठलाग करून बांधकाम अधिकृत करण्यासाठी एक लाखापासून ते तीन लाखांपर्यंतची सुपारी घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहे.
खानापूर तालुक्यातील सुवर्णनगरी म्हणून विटा शहराकडे पाहिले जाते. वाढत्या विटा शहरात सध्या भूखंडाचे दर जवळपास मुंबईतील नरिमन पॉर्इंटच्या बरोबरीत पोहोचले आहेत. त्यामुळे मालमत्ताधारक आपली एक इंचही जागा सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाने बांधकाम परवाना देताना साईट मार्जीन व गटारी, रस्ते यासाठी जागा सोडण्यासह अन्य अटी घालून बांधकाम परवाने दिले आहेत. परंतु, अनेक मालमत्ताधारकांनी इमारतींचे बांधकाम करताना यातील बऱ्याच अटींचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम केल्याचे उजेडात आले आहे.
विटा नगरपरिषद प्रशासनाने नुकत्याच केलेल्या पाहणीत शहरात अनधिकृत बांधकामे केल्याचे निदर्शनास आले. त्यातील आठजणांवर अनधिकृत बांधकामे केल्याने त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. हे आठजण सध्या जात्यात आहेत. परंतु, सुपात असलेल्यांची यादी मोठी आहे. पण पालीका प्रशासनाने या यादीला अद्यापही का हात लावला नाही? असा सवाल विटेकर नागरिकांतून विचारला जात आहे. या यादीतील अनेक मोहरे हे राजकीय संबंधित असल्याने त्यांना पालिका प्रशासनाने ‘क्लिन चीट’ दिली का? असा प्रश्नही नागरिकांतून उपस्थित होत आहे.
मात्र, आता अनधिकृत बांधकामांबाबत पोलिसांत गुन्हे दाखल झालेल्या आठजणांपैकी उर्वरित अन्य बेकायदेशीर बांधकामधारकांचा आता दलालांनी पाठलाग सुरू केल्याचे वृत्त आहे. अनधिकृत बांधकाम यादीत असणाऱ्या लोकांशी संपर्क साधून तुमचे अनधिकृत बांधकाम अधिकृत करून देण्याची या दलालांनी सुपारी घेतल्याचे सांगितले जात असून, दलालांनी सावज पाहून या कामाचा दर १ लाखांपासून ते ३ लाखांपर्यंत निश्चित केल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, हे दलाल एवढी रक्कम घेऊन अनधिकृत बांधकाम अधिकृत कसे व कोणाकडे जाऊन करणार? हा प्रश्न आज तरी अनुत्तरीत आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून, पालिका प्रशासन व सत्ताधारी मंडळींनी अशा दलालांचा शोध घेऊन तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विटेकर नागरिकांतून होत आहे. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात सामाजिक संघटना आणि ठेकेदारांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.

 

Web Title: 'Fielding' of brokers for official construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.